खाकी वर्दीतील कोरोनायोद्ध्या गर्भवती बजावतात १२ तास सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:52 AM2021-05-05T05:52:08+5:302021-05-05T09:57:22+5:30

भीती वाटतेच; पण जनसेवेसाठी रस्त्यावर

Coronary warriors in khaki uniforms perform 12 hours of service even during pregnancy | खाकी वर्दीतील कोरोनायोद्ध्या गर्भवती बजावतात १२ तास सेवा

खाकी वर्दीतील कोरोनायोद्ध्या गर्भवती बजावतात १२ तास सेवा

Next
ठळक मुद्देराणे सांगतात, ‘बाळाला काही होणार नाही ना, ही भीती मनात असतेच, मात्र कर्तव्यापुढे या विचाराकडे दुर्लक्ष करते.

मनीषा म्हात्रे

मुंबई : गर्भावस्थेत आराम करून डोहाळे पुरवून घेण्याच्या दिवसांत मुंबई पोलीस दलातील कोरोनायोद्ध्या १२-१२ तास सेवा बजावताना दिसत आहेत. यात, घरातून बंदोबस्ताचे ठिकाण गाठण्यासाठी तासन‌्तास बस, लोकलसाठी थांबून या रणरागिणी कुठलीही तक्रार न करता सेवा देत आहेत. ‘हो, आम्हालाही बाळासाठी भीती वाटते; पण आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. त्यामुळे तुम्ही घरी राहून सहकार्य करा,’ असे आवाहनही त्या करत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गर्भवती महिला पोलिसांना घरी राहण्याचे आदेश होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई पोलीस दलातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले किंवा विविध आजार जडलेल्या पोलिसांना तसेच गर्भवती महिलांना १२ तास सेवा केल्यानंतर २४ तास आराम देण्याच्या सूचना सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. तसेच त्यांना कार्यालयीन कामाची जबाबदारी देण्यास सांगितले. बऱ्याच ठिकाणी गर्भवतींसाठी हे नियम कागदावरच असल्याचे चित्र आहे. विशेषत: सशस्त्र पोलीस दलातील काही विभागात गर्भवती महिलाही बाहेर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. वरिष्ठांंनी गर्भावस्थेच्या ५ महिन्यांपर्यंत बाहेर ड्यूटी करण्याचा अजब फतवा काढला आहे. सहाव्या महिन्यानंतर कार्यालयीन कामासाठी घेण्यात येणार असल्याचे समजते.

येथील गर्भवती महिलांना १२/ २४ तासांचा फॉर्म्युलाही लागू न केल्यामुळे त्यांना आठवड्यातून एकच सुट्टी मिळत आहे. त्यामुळे काहीसा नाराजीचा सूर आहे. नियम सर्वांना सारखे हवेत. पोलीस ठाणे आणि सशस्त्र विभागात वेगळे नियम कसे, असा सवालही काही गर्भवती महिला पोलिसांनी उपस्थित केला. मात्र कर्तव्यापुढे काही नाही म्हणत ही मंडळी प्रामाणिकपणे सेवा बजावताना दिसत आहेत.

तुमचे बाळ सुरक्षित राहावे म्हणून आम्ही कर्तव्यावर
मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रणाली सहदेव राणे सध्या मरोळ येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. वडील पोलीस असल्याने लहानपणीच त्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांचे पती, सासरेही पोलीस आहेत. चारकोप परिसरात त्या राहत असून, चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. सध्या गोरेगावमध्ये त्या गार्ड म्हणून कार्यरत आहेत. सकाळी घरातले काम उरकून ड्यूटीवर वेळेत पोहोचण्यासाठी ७ वाजताच त्या घर सोडतात. तेथून पुढे बस अथवा लोकलसाठी थांबायचे. बसमधील गर्दीत चढता येत नसल्याने अनेकदा तासन‌्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. तेथून कसेबसे ड्यूटीचे स्थान गाठायचे. १२ तास कर्तव्य बजावल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठीची कसरत कायम आहे. तरीही कुठलीही तक्रार न करता त्या सेवा बजावत आहेत.

राणे सांगतात, ‘बाळाला काही होणार नाही ना, ही भीती मनात असतेच, मात्र कर्तव्यापुढे या विचाराकडे दुर्लक्ष करते. आम्ही पोटच्या गोळ्याकडे दुर्लक्ष करून तुमचे बाळ, कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून धडपडत आहाेत, म्हणून तुम्ही घरी राहून सहकार्य करा. हेही दिवस लवकर जातील, असे त्या म्हणाल्या. त्यांच्यासारख्याच अनेकजणी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.

 

Web Title: Coronary warriors in khaki uniforms perform 12 hours of service even during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.