Corona Virus: कोरोना व्हायरसप्रकरणी राज्यात सहा जण निरीक्षणाखाली; ८३ रुग्णांची दूरध्वनीद्वारे विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:11 IST2020-02-04T04:26:33+5:302020-02-04T06:11:05+5:30
सांगलीत सोमवारी एक जण रुग्णालयात दाखल, विमानतळावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

Corona Virus: कोरोना व्हायरसप्रकरणी राज्यात सहा जण निरीक्षणाखाली; ८३ रुग्णांची दूरध्वनीद्वारे विचारपूस
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे सोमवारी एकाला रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल करण्यात आले. हा प्रवासी चीन येथून आला असून, त्याला सर्दी, तापाची सौम्य लक्षणे जाणवल्याने मीरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सध्या मुंबई, पुणे आणि सांगली येथे सहा जण रुग्णालयात दाखल आहेत. सुमारे ८३ प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस सुरू असून, त्यापैकी २६ जणांच्या आरोग्यविषयक पाठपुराव्यास १४ दिवस पूर्ण झाल्याने तो सोमवारी थांबविण्यात आला आहे. मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ८७८ प्रवाशांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने, मुंबई विमानतळावर आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीला राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी आणि १५ आरोग्य कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून १०४ प्रवासी आले.
१८ जानेवारीपासून त्यापैकी २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी १८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून, उर्वरित तिघांचे प्रयोगशाळा निकाल मंगळवारपर्यंत प्राप्त होतील. भरती झालेल्या २१ प्रवाशांपैकी १५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात १, नायडू रुग्णालयात ४ तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे १ जण भरती आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल
कोरोना संदर्भात बदलत्या परिस्थितीनुसार मार्गदर्शक सूचनांमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, वुहान शहरातून येणाºया प्रवाशाला किंवा मागील दोन आठवड्यांत वुहान प्रवासाचा इतिहास असणाºया प्रवाशाला लक्षणे असोत किंवा नसोत विलगीकरण कक्षात भरती करून त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेण्यात येईल. बाधित भागातून १५ जानेवारी, २०२० रोजी किंवा त्यानंतर येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांसाठी करण्यात येईल. पूर्वी हा पाठपुरावा २८ दिवसांसाठी करण्याच्या सूचना होत्या. या काळात काही लक्षणे आढळली, तर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेण्यात येईल.