Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खाकी वर्दीतली 'माणूसकी'... बंद काळात निराधार भिकाऱ्यांना पोलिसांचाच आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 16:47 IST

जतना कर्फ्युदिनी लोकांनीच पुढाकार घेऊन घरात राहणे पंसत केले आहे. त्यामुळेच, रस्ते ओसाड पडले असून चिटपाखरुही दिसेना अशी परिस्थीती आहे.

मुंबई - कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, देशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. या बंदच्या काळात पोलीस आणि डॉक्टर्स व्यस्त आहेत, आपले कर्तव्य बजावत आहेत. या पोलिसामधील माणूसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले.

जतना कर्फ्युदिनी लोकांनीच पुढाकार घेऊन खरात राहणे पंसत केले आहे. त्यामुळेच, रस्ते ओसाड पडले असून चिटपाखरुही दिसेना अशी परिस्थीती आहे. नागरिकांनी पुढील ८ दिवस आपल्याला पुरेल एवढे अन्नधान्य घरी नेऊन आपल्या दाणा-पाण्याची सोय केली आहे. मात्र, मंदिरे बंद, रस्ते ओसाड, बाजारात शुकशुकाट असल्याने रस्त्यावरील भिकारी आणि निराधार लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी, सामाजिक संघटना आणि प्रशासकीय यंत्रणा पुढे येत आहे. सोलापूरातील बंदमध्ये खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडले. सोलापूरातील निराधार आणि रस्त्यावर फिरणारे भिकारी यांच्या पोटापाण्याची सोय चक्क पोलिसांनी केली. पोलिसांनी या निराधार नागरिकांना आधार देण्याचं काम केलं. महाराष्ट्र पोलीस- वर्दीतला माणूस या पोलिसांबद्दल सकारात्म बातम्या देणाऱ्या फेसबुक पेजने याबाबत आपल्या पेजवरुन माहिती दिली आहे. 

बंद काळात पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यात येत आहे, थिल्लर तरुणांना पोलिसी धाक दाखवण्यात येत आहे. याबाबतचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांमध्ये दडलेल्या माणुसकीचेही दर्शन होत आहे. खाकी वर्दीतला माणूस आज मानवतेसाठी रस्त्यावर उभा आहे. कोरोना काळातील पोलिस आणि डॉक्टरांचे कार्य हे मानवजातीला प्रेरणादायी असून मानवता वाढवणारे आहे. त्यामुळे, या सर्वांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे आपण कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून, 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.  पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रादुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईपोलिससोलापूर