Corona Vaccine Mumbai has got stock of 99,000 vaccines another 1 lakh 35,000 vaccines will be available soon | Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार

Corona Vaccine : मोठा दिलासा! मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा, आणखी एक लाख ३५ हजार लस लवकरच मिळणार

मुंबई - कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या ९९ हजार लसींचा साठा मुंबई महापालिकेला मिळाल्यामुळे शनिवारी सकाळी सरकारी व पालिका केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली. तर लवकरच आणखी एक लाख ३५ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस लसीकरण सुरळीत होऊ शकणार आहे. मात्र लसींचा अतिरिक्त साठा आल्यानंतरच खाजगी केंद्रावर लसीकरण सुरू केले जाणार आहे.

मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ९० खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री ९९ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्यामुळे मुंबईत शनिवारी सरकारी आणि महापालिकेच्या केंद्रावरच लसीकरण होऊ शकले. त्यातही कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर मेसेज आलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. लवकरच आणखी एक लाख ३५ हजार लसींचा साठा मुंबईला मिळणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस लसीकरण होऊ शकते, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

महापालिका आणि शासनाच्यावतीने मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं सुरू करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून संपूर्ण मुंबईत प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-१९ लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात शनिवार ते सोमवारपर्यंत या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. मात्र आणखी काही लसींचा साठा मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. अतिरिक्त साठा आल्यानंतर मंगळवारपासून अन्य खाजगी केंद्रावर लसीकरण सुरू होऊ शकेल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccine Mumbai has got stock of 99,000 vaccines another 1 lakh 35,000 vaccines will be available soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.