Corona Vaccine : मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा; ठाण्यात ऑक्सिजन संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:06 IST2021-04-11T04:17:11+5:302021-04-11T07:06:00+5:30
Corona Vaccine: मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ९० खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

Corona Vaccine : मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा; ठाण्यात ऑक्सिजन संपला
मुंबई / ठाणे : कोविड-१९ ला प्रतिबंध करणाऱ्या ९९ हजार लस डोसचा साठा मुंबई महापालिकेला मिळाल्याने शनिवारी सकाळी सरकारी व पालिका केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली, तर लवकरच आणखी एक लाख ३५ हजार लस डोसचा साठा उपलब्ध होणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस लसीकरण सुरळीत होऊ शकेल. दुसरीकडे ठाण्यात महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी समोर आली. त्यामुळे येथील आयसीयूतील २६ रुग्णांना तत्काळ हलविण्यात आले.
मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी ९० खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सध्या कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर मेसेज आलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. महापालिका आणि शासनाच्या वतीने मुंबईत ४९, तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून संपूर्ण मुंबईत प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते; परंतु कोविड-१९ लस डोसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात शनिवार ते सोमवारपर्यंत या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. आणखी काही लसींचा साठा मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. अतिरिक्त साठा आल्यानंतर मंगळवारपासून अन्य खासगी केंद्रावर लसीकरण सुरू होऊ शकेल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
ठाण्यात लसींसह रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना आता महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या ज्युपीटर रुग्णालयाशेजारी असलेल्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा आला. या प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक मात्र भयभीत झाल्याचे दिसून आले. ठाणे शहरात दररोज पंधराशे ते अठराशे (पान ५ वर)
उत्पादन कमी झाल्याने आक्सिजनचा तुटवडा
ऑक्सिजन पुरवठा करणा-या कंपन्यांमध्ये उत्पादन कमी झाल्याने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु, रात्री २ ते ३ टन साठा मिळणार असून, रविवारी सकाळ किंवा दुपारपर्यंत ८ ते १० टन साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चिंता असणार नाही. परंतु, ऑक्सिजन साठा संपला नसून सध्या रात्रभर पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. सकाळी तो उपलब्ध झाला नाही तर रुग्णांचे हाल नको या उद्देशानेच येथील रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले.