Join us
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination:‘त्या’ विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या, शिक्षण संचालनालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 09:30 IST

Corona Vaccination: सद्य:स्थितीत १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू असून, यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

मुंबई : सद्य:स्थितीत १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू असून, यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

दहावी, बारावीच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा १४ आणि ५ मार्चपासून सुरू आहेत. शिवाय त्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा येत्या १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आवश्यक असल्याने शिक्षण संचालनालयाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ डिसेंबरला लसीकरणात प्राधान्य द्यावे अशा मागणीची बातमी प्रसिद्ध केली होती. त्या मागणीला यश मिळाले असून, दहावी, बारावीच्या लसीकरणाला देण्यात येणाऱ्या प्राधान्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील दहावी, बारावीच्या विद्यार्थी लसीकरणाचा अहवाल संचालनालयाला सादर करण्याच्या सूचनाही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहेत.

 शाळांमध्ये सोय केल्यास येईल वेगमुंबईत आणि राज्यातील काही जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या असून, दहावी बारावीचे विद्यार्थी सद्य:स्थितीत प्रत्यक्ष उपस्थित राहत आहेत. मुलांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास सांगितल्यास अनेक विद्यार्थी व पालक टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक ती व्यवस्था करून विद्यार्थी लसीकरण करून घेतल्यास ते लवकर होऊ शकेल अशी प्रतिक्रिया काही शिक्षक व मुख्याध्यापक देत आहेत.  

टॅग्स :कोरोनाची लसविद्यार्थीमहाराष्ट्र सरकार