Join us  

Corona vaccination : मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:29 PM

Corona vaccination in Mumbai : मुंबई पालिकेला मिळणारा लसींच्या साठा जवळपास बंद झाला आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णता थंडावली आहे. 

मुंबई- मुंबईसह राज्यात १ मे पासून वयवर्ष १८ पुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल असे जाहीर केले होते. परंतू राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे व मुंबईच्या महापौर  किशोरी पेडणेकर यांनी १५ मे पर्यंत १८ पुढील व्यक्तींसाठीचा लस साठा उपलब्ध नाही असे सांगितले होते आणि ते आत्ता खरे ठरत असल्याने व लसींचा साठा नसल्याने मुंबईकर लस घेण्यापासून वंचित ठरले आहेत.  १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी मुंबईत केवळ नायर रुग्णालय, बी.के.सी. कोव्हिड सेंटर, सेवनहिल्स रुग्णालय, कूपर रुग्णालय व राजावाडी रुग्णालय अशा पाचच केंद्रावर लसीकरण सुरू असून इतर खाजगी व सरकारी केंद्रे बंद आहेत. त्याचे कारण मुंबई पालिकेला मिळणारा लसींच्या साठा जवळपास बंद झाला आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णता थंडावली आहे. 

त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या गोंधळामुळे मुंबईतील नागरिक हवालदिल झाली असून मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढावा अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातप्रमाणेच ४५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील लाखो मुंबईकरां समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पहिली मात्रा घेतल्यानंतर एका विशिष्ट कालावधीत दुसरी मात्रा घेणे अपेक्षित आहे. परंतु अतिशय कमी साठा व मोजकीच केंद्रे खुली असल्याने दुसरी मात्रा देण्याची वेळ आलेल्या ची फरफंट सुरू आहे. त्याच बरोबर ४५ वर्षाचा पुढील वयोगटातील अनेक लोकांची पहिली मात्रा ही घेणे बाकी आहे तसेच पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याकरिता ऑनलाइन वेळापत्रकात कुठल्याही स्लॉट उपलब्ध नाही. जर साठाच नाही तर मग १ मे पासूनची घोषणा करण्याची घाई का केली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे किल्लेदार यांनी पत्रात नमूद केले आहे.

लसीची दुसरी मात्रा कधी मिळणार, त्यासाठी अपेक्षित मुदत चूकल्यास पर्याय काय, सदर डोस चूकल्यास प्रतिकारशक्ती कमी तर होणार नाही ना, दुसरी मात्र कधी मिळणार हे कळले तर बरे होईल अशां अनेक प्रश्नांनी मुंबईकरांना भेडसावले आहे. त्याच प्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी पाच केंद्र असल्याने फारच मर्यादा आल्या आहेत. लांबून लांबून येणारे लोक एवढ्या उन्हात कसे काय लसीकरणांसाठी येणार हा ही प्रश्नच आहे असा सवाल त्यांनी केला आहे.

लसीकरण घराजवळ मिळायला हवं त्यासाठी केंद्रे वाढवायला हवीत. म्हणजे गर्दीही होणार नाही आणि लोकांना घराजवळ लसीकरण सुलभ होईल अशी भूमिका त्यांनी पत्रात विषद केली आहे.

 या सर्व बाबींचा संवेदनशीलपणे विचार करून मार्ग काढावा आणि जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमनसेउद्धव ठाकरे