Corona Vaccination : कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वडिलांनी कोर्टात दाखल केला एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 12:15 IST2022-02-02T08:54:13+5:302022-02-02T12:15:56+5:30
Corona Vaccination: कोरोनावरील लस घेऊन डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्याने वडिलांनी १००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा उच्च न्यायालयात केला आहे. लसीच्या दुष्परिणामामुळे मुलगी गमवावी लागल्याचे त्यांनी दाव्यात म्हटले आहे.

Corona Vaccination : कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वडिलांनी कोर्टात दाखल केला एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा
मुंबई : कोरोनावरील लस घेऊन डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्याने वडिलांनी १००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा उच्च न्यायालयात केला आहे. लसीच्या दुष्परिणामामुळे मुलगी गमवावी लागल्याचे त्यांनी दाव्यात म्हटले आहे.
दिलीप लुनावत यांनी केलेल्या याचिकेनुसार, त्यांची मुलगी स्नेहा लुनावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असून शरीराला धोका नाही, याची खात्री तिला देण्यात आली. ती आरोग्यसेविका असल्याने तिला महाविद्यालयात लस घेण्यास भाग पाडले.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि एम्सने या लसीचे दुष्पपरिणाम नसल्याची चुकीची माहिती पसरवली आणि राज्य सरकारने त्याबाबत खात्री न करता लसींचा पुरवठा केला. माझ्या मुलीने २८ जानेवारी २०२१ रोजी कोविशिल्ड लस घेतली आणि १ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला, असे लुनावत यांनी याचिकेत म्हटले आहे. माझ्या मुलीला न्याय देण्यासाठी आणि अन्य लोकांचा जीव वाचविण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी यंत्रणांनी मुलीला चुकीची माहिती देऊन लस दिल्याचे मानावे. सरकारी यंत्रणांची गुन्हेगारी वृत्ती असून त्यांनी आतापर्यंत ‘वारंवार बदलण्यात येणारे प्रश्न’ (एफएक्यू) बदललेले नाहीत. ते आजही लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणांमावर उपचार असल्याचा दावा करत आहेत.
या आहेत मागण्या
-सरकारी यंत्रणांनी मुलीला चुकीची माहिती देऊन लस दिल्याचे मानावे. सरकारी यंत्रणांची गुन्हेगारी वृत्ती असून त्यांनी आतापर्यंत ‘वारंवार बदलण्यात येणारे प्रश्न’ (एफएक्यू) बदललेले नाहीत. ते आजही लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणांमावर उपचार असल्याचा दावा करत आहेत.
- राज्य सरकारला अंतरिम नुकसानभरपाई म्हणून १००० कोटी रुपये देण्याचे निर्देश द्यावेत. ही रक्कम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून वसूल करावेत.
-गुगल, यूट्यूब, मेटा यांसारख्या कंपन्यांनी लसीमुळे होणाऱ्या मृत्यूची खरी आकडेवारी लपवल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, अशा मागण्या लुनावत यांनी याचिकेद्वारे केल्या आहेत.