corona updates 50 thousands Remdesivir injections to Government of Maharashtra BJP leaders announce from Gujarat | Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

Remdesivir: महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; भाजप नेत्यांची गुजरातमधून घोषणा

Remdesivir : राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची गैरसोय होत आहे. केंद्रानं आता रेमडेसिवीरच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. पण राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असल्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुजरातनं महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करावा अशी मागणी केली होती. भाजपाने आज रेमडेसिवीरसाठी थेट दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. कोरोना साथ थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले होते. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्यात करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. कंपनीशी चर्चा करण्यासाठी आज प्रवीण दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली. 

"ग्रुप फार्मसीला आम्ही प्रत्यक्ष भेट दिली, कंपनी व्यवस्थापन आणि मालकांशी चर्चा केली, मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला लिखित अर्जही केला आहे. या कंपनीला परवानगी मिळावी व महाराष्ट्राला रेमडेसिवीर उपलब्ध व्हावेत, यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या संपर्कात असून आज किंवा उद्या पर्यंत केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल", अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली. 

राज्य सरकारच्या व्यवस्थापनावर केली टीका
कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत झाली आहे. राज्य सरकारने आरोप, प्रत्यारोपाचा खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर आज ही वेळ आली नसती असा आरोप करून महाराष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्य भावनेतून भाजपा कोरोना रुग्णांची मदत करीत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.  

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोना लसींची जितकी गरज असेल, तितक्या प्रमाणात लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तसेच ग्रुप फार्मा प्रा. लि. ह्या कंपनीने दिलेल्या

रेमडेसिवीरमुळे देखील रुग्णांची मोठ्या प्रमाणावरील असलेली मागणी पूर्ण करता येईल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. दमणच्या या भेटीत त्यांच्या समवेत  भाजप आमदार प्रसाद लाड आणि दमणचे खासदार लालु पटेल व  इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona updates 50 thousands Remdesivir injections to Government of Maharashtra BJP leaders announce from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.