Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २४ तासांत ८७ पोलिसांना कोरोनाची बाधा; १८ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:31 IST

आतापर्यंत ६७३ बरे झाले

मुंबई : गेल्या २४ तासांत राज्यात ८७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १७५८ वर गेला आहे. यापैकी ६७३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात दिवसाला ६० ते ७० हून अधिक पोलीस कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १८ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. त्यात मुंबई पोलीस दलातील ११ पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर तसेच विविध जबाबदारी असलेल्या पोलिसांची वेळोवेळी कोरोना चाचणी होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मनुष्यबळाअभावी पोलिसांचा २४/१२ चा फॉर्म्युलाही हळूहळू बंद होत आहे. त्यामुळे पोलिसांना आरामाची आवश्यकता असल्याचे मत वर्तविण्यात येत आहे.

आजारपणामुळे एका पोलिसाचा मृत्यू

मुंबईत आजारपणामुळे एका पोलिसाचा रविवारी मृत्यू झाला आहे. वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नीलेश अण्णासाहेब जोंधळे हे १ आॅक्टोबर २०१९ पासून नाशिक येथे मेंदूच्या आजारावर उपचार घेत होते. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

ठाण्यात एकाच दिवसात आठ पोलिसांना बाधा

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात रविवारी एकाच दिवसात एका उपनिरीक्षकासह आठ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे आतापर्यंत १0४ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले असून एका महिला पोलिसाचा मृत्यू झाला आहे, तर ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस