Corona patients in the state at 209; 22 patient report per day; New patient in Mumbai, Pune, Nashik | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २०९ वर; दिवसभरात २२ रुग्णांची नोंद; मुंबई, पुणे, नाशकात नवे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २०९ वर; दिवसभरात २२ रुग्णांची नोंद; मुंबई, पुणे, नाशकात नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले तब्बल २८ नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०९ एवढी झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १२ रुग्ण मुंबईचे असून, ८ पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे, तर सांगली, बुलडाणा, नाशिक आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.

मुंबईतील केईएम रुग्णालयात शनिवारी एका ४० वर्षीय महिलेचा तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता, तर बुलडाणा येथे ४५ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. या दोघांचे अहवाल रविवारी प्राप्त झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ३९४ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४,२१० जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ३,४५३ जणांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याशिवाय २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,१५१ व्यक्ती घरगुती एकांतवासात (होम क्वारंटाईन) असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हजारो गावकरी ‘क्वारंटाईन’मध्ये

चंदीगड : बलदेव सिंग या ७० वर्षांच्या शीख आध्यात्मिक गुरूचा काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर या गुरूने गेल्या महिनाभरात ज्या १५ गावांमध्ये फिरून प्रवचने केली त्या गावांमधील हजारो नागरिकांना सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागल्याने संपूर्ण पंजाबमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

ही घटना २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशव्यापी ‘लॉकडाऊन’ लागू होण्याच्या आधीची आहे व किंबहुना म्हणूनच असा टोकाचा उपाय योजण्याची नितांत गरज अधोरेखित करणारी आहे. गेली अनेक वर्षे हजारो अनुयायांचे निस्सीम श्रद्धास्थान असलेला हा गुरू आता मृत्यूनंतर मात्र कोरोनासारख्या महाभयंकर साथीचा ‘सुपर प्रसारक’ म्हणून हेटाळणीचा व तिरस्काराचा विषय बनला आहे.

बंगा जिल्ह्याचे रहिवासी असलेले हे बलदेव सिंग आता युरोपमधील कोरोना साथीचे केंद्रबिंदू ठरलेल्या इटली आणि जर्मनी या देशांचा दौरा करून आले होते. ते आले तोपर्यंत भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता व स्थानिक पातळीवर प्रतिबंधक उपाय योजणे सुरू झाले होते. जिल्हा प्रशासनाने त्यांना बाहेर कुठेही न फिरता घरातच ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्याचे निर्देश दिले होते; परंतु ते झुगारून बलदेव सिंग २ सहकाऱ्यांना घेऊन अनेक दिवस गावोगाव प्रवचने करीत फिरत राहिले.

जगात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाखांकडे; मृतांचा आकडा वाढला; ६ लाख रुग्णांवर उपचार सुरू

जगभरातील १९९ देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत ३२,२०० जणांचा बळी घेतला आहे. बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८५ हजारांवर म्हणजेच ७ लाखांच्या दिशेने पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १ लाख ४७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज अखेर ५ लाख ६ हजार ५०० जणांवरती विविध देशांत उपचार सुरू आहेत.

अमेरिकेमध्ये कोरोनाच्या चाचण्या जोरात सुरू असून, तेथील रुग्णांची संख्या जवळपास सव्वालाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ८०० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच आतापर्यंत या आजाराने सुमारे २,२५० लोकांचा बळी गेला आहे.
इटलीमधील मृतांचा आकडा १० हजारांवर गेला असून, तेथे सुमारे ९३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल स्पेनमध्ये जवळपास ७९ हजार एवढे बाधित रुग्ण आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तेथे ५,५०० हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचा आकडा ६,५२५ एवढा झाला आहे.

स्पेनच्या राजकन्येचेही कोरोनामुळे निधन झाल्याने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. हीच स्थिती जर्मनीमध्ये आहे. कोरोनामुळे देशाचे काय होईल, या विवंचनेतून जर्मनीमधील एका मंत्र्याने आत्महत्या केली. तेथील रुग्णांची संख्या जवळपास ५९ हजार झाली असून, त्यामध्ये नवीन रुग्ण ५५० एवढे आहेत. आतापर्यंत जर्मनीत ४५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटनमध्ये संख्या वाढली

च्फ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड, बेल्जियम, या देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या २३०० वर गेली आहे तर ब्रिटनमध्ये १२०० हून अधिक आहे.

च्या दोन देशांत मिळून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५७ हजारांहून अधिक आहे. नेदरलँड आणि बेल्जियम या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रत्येकी ११ हजार आहेत. परंतु तेथे मृतांची संख्या तुलनेने खूप कमी आहे.

Web Title: Corona patients in the state at 209; 22 patient report per day; New patient in Mumbai, Pune, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.