धारावी मॉडयुलनेच मरणार मुंबईतला कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:20 PM2020-06-28T15:20:06+5:302020-06-28T15:21:00+5:30

आता येथील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी धारावी मॉडयुल कामी येणार आहे.

Corona from Mumbai will die with Dharavi module | धारावी मॉडयुलनेच मरणार मुंबईतला कोरोना

धारावी मॉडयुलनेच मरणार मुंबईतला कोरोना

Next

 

मुंबई : हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे. परिणामी आता येथील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी धारावी मॉडयुल कामी येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना विषाणू विरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर मुंबई महापालिका उपनगरांमध्ये कोरोनाला मारण्यासाठी काम करत आहे.

वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला. याचा एक भाग म्हणून प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात ५० रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत  तपासणी करतात. गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान १० हजार घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक समुदाय स्वयंसेवक, थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटर सह सुमारे १०० घरांचे सर्वेक्षण करतो. अशा रीतीने आठवड्यात २५ लाख लोकांचे  स्क्रीनिंग होणार आहे. दरम्यान, कोरोना या आजाराच्या संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी; या दोन आकडेवारी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक; तर त्याचवेळी रुग्ण वाढ होण्याची दैनंदिन सरासरी टक्केवारी जेवढी कमी तेवढी परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शक असते.

 

मुंबईकरांसाठी दिलासा
रुग्ण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने चाळीशी ओलांडली आहे. २४ जूनच्या आकडेवारीनुसार हा कालावधी तब्बल ४१ दिवसांवर पोहोचला आहे. हाच कालावधी १६ जून रोजी ३० दिवस एवढा होता. म्हणजेच साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३० दिवसांवरुन ४१ दिवसांवर पोहचला आहे. तर याच वेळी रुग्ण संख्येत होणा-या दैनंदिन वाढीची सरासरी टक्केवारी ही देखील दिवसेंदिवस कमी होत असून, १७ जून रोजी २.३० टक्के असणारी ही टक्केवारी, आता १.७२ टक्क्यांवर आली आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्ण वाढीच्या दैनंदिन सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदविली जात आहे. या दोन्ही बाबी मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहेत.

 

मुंबई महापालिका काय म्हणते?
मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यताही तुलनेने अधिक असणा-या या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणा-या मुंबईत  मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. परिणामी कोरोना संसर्गास परिणामकारकरित्या आळा घालणे शक्य होत आहे.

 

रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत सकारात्मक वाढ

  • २२ मार्च रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी केवळ ३ दिवस होता.
  • याचाच अर्थ २२ मार्च रोजी रुग्णांची असणारी संख्या तीन दिवसात दुप्पट होत होती.
  • १५ एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५ दिवस एवढा नोंदविण्यात आला.
  • १२ मे रोजी हाच कालावधी अधिक सकारात्मक होत तो १० दिवसांवर पोहचला.
  • २ जून रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी २० दिवसांवर आला.
  • १६ जून रोजी ३० दिवस एवढा नोंदविण्यात आला.
  • २४ जून रोजी हा कालावधी तब्बल ४१ दिवसांवर पोहचला आहे.
     

 

  • विविध नागरी समाज संघटनांसह सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवण्याचे धारावी मॉडेल उपनगरामध्येही राबविण्यात येत आहे.
  • स्थानिक डॉक्टर, क्रेडाई-एमएचआय, भारतीय जैन संघटना, देश अपनाये फाउंडेशन यांच्याशी करार झाला आहे.
  • मुंबई व पुण्यातील लोकांची तपासणी करण्यासाठी १ लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट किट देखील खरेदी केले जात आहेत.
    • मुंबईत दररोज चाचणीचे प्रमाण सध्याच्या ४ हजार ते ४ हजार ५०० सरासरीपेक्षा ६ हजारपर्यंत जाईल.
       

Web Title: Corona from Mumbai will die with Dharavi module

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.