Join us

कोरोना मेडिक्लेमने ओलांडला १० हजार कोटींचा पल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 19:00 IST

Corona Mediclaim : महाराष्ट्रातील क्लेम तीन हजार कोटींवर

मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या क्लेमने १० हजार कोटींचा पल्ला ओलांडला आहे. गेल्या आठ महिन्यांत ६ लाख ६५ हजार रुग्णांनी उपचार खर्चांपोटी हे क्लेम दाखल झाले असून त्यापैकी ५ लाख ९ हजार रुग्णांचे क्लेम मंजूर झाले आहेत. एकूण क्लेमची रक्कम ९,९८९ कोटी असली तरी मंजूर झालेली रक्कम ४ हजार ८०७ कोटी रुपये आहे. क्लेम करणारे ३७ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.

जनरल इन्शुरन्सकडे दाखल झालेल्या आरोग्य विम्याच्या क्लेमच्या आकडेवारीचे आढावा घेतल्यास रुग्णांनी उपचार खर्चापोटी दाखल केलेल्या क्लेमची सरासरी आकडा १ लाख ५० हजार रुपये आहे. तर, विमा कंपन्यांनी मंजूर केलेली रक्कम ९४ हजार ५०० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे उपचारांवर खर्च झालेल्या रकमेपैकी फक्त ६३ टक्के रकमेचा परतावा मिळत असल्याचे स्पष्ट होते. कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण महाराष्ट्रात होते. त्यामुळे राज्यात उपचार घेणा-या आणि त्यापोटी क्लेमची मागणी करणा-या रुग्णांची संख्यासुध्दा सर्वाधिक आहे. आजवर राज्यातील २ लाख ४६ हजार ५७४ रुग्णांनी परताव्यासाठी क्लेम दाखल केले असून ती रक्कम २ हजार ९५५ कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी १ लाख ८१ हजार रुग्णांचे क्लेम मंजूर झाले असून त्यांना विमा कंपन्यांनी १४५९ कोटी रुपये अदा केले आहेत. राज्यातील रुग्णांवरील सरासरी उपचार खर्च १ लाख १९ हजार रुपये असून परताव्याची रक्कम ८०,२०० रुपये आहे. राज्यातील खर्च आणि परताव्याची रक्कम ही देशातील सरासरीपेक्षा कमी असल्याचे ही आकडेवारी सांगते.   

उपचार घेणा-या रुग्णसंख्येत घट

आँक्टोबर महिन्यांत २ लाख ७ हजार रुग्णांचे ३ हजार ६७३ कोटींचे क्लेम दाखल झाले होते. नोव्हेंबर महिन्यांत कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने पहिल्यांदाच उपचार घेणा-या रुग्णांची संख्याही घटली आहे. या महिन्यांत १ लाख ४६ हजार रुग्णांचे ३ हजार १६ कोटींचे क्लेम दाखल झाले आहेत. ६ लाख ६४ हजार रुग्णांपैकी ५ लाख ८ हजार रुग्णांचे क्लेम आजवर मंजूर झाले आहेत. १ लाख ५८ हजार रुग्णांचे क्लेम अद्याप मंजूरीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यातून निष्पन्न होत आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यावैद्यकीयआरोग्यमुंबईमहाराष्ट्र