Corona effect: House prices will remain stable | कोरोना इफेक्ट : घरांच्या किंमती स्थिरच राहणार

कोरोना इफेक्ट : घरांच्या किंमती स्थिरच राहणार

 

सचिन लुंगसे

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विविध क्षेत्रांसह बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प झालेल्या विविध गृह प्रकल्पाचे काम आता अनलॉकनंतर सुरु झाले असले तरी अद्यापही या कामांना अपेक्षित वेग पकडलेला नाही. कारण गृह प्रकल्पांसाठी आवश्यक कच्चा मालासह मजुर आणि इतर घटकांचा अद्यापही तुटवडा भासत असून, कोरोनामुळे घरांच्या किंमती कमी होतील, असा विविध स्तरातून वर्तविण्यात आलेला अंदाज तंतोतंत लागू होणार नाही, अशा प्रतिक्रिया गृहप्रकल्पांशी सबंधित विकासकांच्या संघटना आणि गृहनिर्माण तज्ज्ञांनी  ‘लोकमत’ला दिल्या आहेत. विशेषतः बांधकाम क्षेत्रात सुधारण होईल, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही. घरांच्या किंमती कमी होणार नाहीत. वाढणारदेखील नाही. घरांच्या किंमती स्थिर राहतील. घरांच्या किंमती कमी झाल्या तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

क्रेडाईचे उपाध्यक्ष बोमन इराणी यांनी सांगितले की, सरकारने प्रिमिअम कमी करण्याबाबत विचार केला पाहिजे. केंद्राने करामध्ये सवलत देण्याबाबत विचार केला पाहिजे. या गोष्टी जुळून आल्यानंतर घरांच्या किंंमती कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा घरांच्या किंमती कमी होणार नाहीत. अगदीच्या ज्या विकासकांना आपली घरे विकायची आहेत. किंवा ज्यांच्यासमोर पर्याय नाही. किंवा येथील प्रकल्पातील घरे विकून दुसरीकडे गुंतवणूक करायची आहे, असे विकासक आपली घरे कमी किंमतीमध्ये विकतील. मात्र हे प्रमाण देखील ५ ते १० टक्के असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून बांधकाम क्षेत्र तोटयात आहेत. अशावेळी घरांच्या किंमतींमध्ये वाढ झालेलीच नाही. मग जर घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली नसेल तर घरांच्या किंमती कमी होतील कशा? हा प्रश्नच आहे. आणि याशिवाय बांधकाम क्षेत्राशी वॉचमन, लिफ्ट, ग्रीलसह उर्वरित घटक बांधलेले असतात. ही एक साखळी असते. या प्रत्येक घटकाचा विचार करावा लागतो. दुसरे म्हणजे बांधकाम क्षेत्रातील ७५ टक्के मजूर कोरोनामुळे आपआपल्या गावी गेले होते. त्यातील ५० टक्के मजूर आता परत येत आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा आहे. दरम्यान, कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत. अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. उर्वरित अनेक प्रश्न आहेत. याकडे लक्ष दिले पाहिजे.

....................................
 

...तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका
गेल्या पाच वर्षांपासून घरांच्या किंमतीमध्ये चढ उतार सुरु आहेत. हे क्षेत्र फार काही तेजीत होते, असे नाही. गेल्या पाच ते आठ वर्षांपासून या क्षेत्रात चढ उतार होत आहे. मुंबईत घरे विकली जात नाहीत कारण येथील घरे वन रुम किचन पध्दतीने बांधली गेली नाहीत. जी घरे बांधली गेली टू रुम किचन, थ्री रुम किचन अशी बांधली गेली. याच्या किंमती कोटयवधी आहेत. परिणामी ग्राहक याकडे फिरकला नाही. कॉर्पोरेट ग्राहक या घरांकडे आकर्षित झाला. मध्यम वर्गीयांना परवडणारी घरे मुंबईत बांधली गेली नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते; तेव्हापासून आजपर्यंत कोणीच म्हाडाचे धोरण बदलले नाही. बंद पडलेले एसआरए अद्याप सुरु झाले नाहीत. बांधकाम क्षेत्रात सुधारण होईल, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही. घरांच्या किंमती कमी होणार नाहीत. वाढणारदेखील नाही. घरांच्या किंमती स्थिर राहतील. घरांच्या किंमती कमी झाल्या तर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसेल.
- डॉ. सुरेंद्र मोरे, अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा को.ऑप. हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड
 
....................................
 

 

- मुंबई महानगर प्रदेशातील २ हजारांहून अधिक  प्रकल्पांचे बांधकाम ठप्प झाले आहे.
-  १० ते २० टक्के बांधकाम सुरु आहे.
- ७ ते ८ लाख कामगार हे प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या बेरोजगार झाले आहेत.
- बँक व्यवहार, गृह कर्ज गोठले आहे.
- सिमेंट, स्टिल, कलर, सिरॅमिकसारखे क्षेत्र मागे पडले आहे.
- मजूर मिळेनासे झाले आहेत. कारण बहुतांश राज्य, जिल्हे यांच्या सीमा पार करता येत नाहीत.
- आर्थिक घडी विस्कटली आहे. पुढील चार ते पाच महिने याचा परिणाम भोगावे लागणार आहेत.
- लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर बंदी आली. घरांच्या निवडीसाठीच्या भेटी बंद झाल्या. त्याचा परिणाम घराच्या खरेदीवर झाला.
- संगणकाच्या मदतीने आता आभासी भेटी, माहिती देणे अशी कामे सुरु झाली आहेत.


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona effect: House prices will remain stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.