कोरोनामुळे क्षयरुग्ण मुख्य प्रवाहापासून वंचित; रुग्णांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय घट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:21 AM2021-03-24T01:21:25+5:302021-03-24T01:21:41+5:30

जागतिक क्षयरोग दिनविशेष; राज्यात मागील वर्षी सरकारी रुग्णालयांत ९५ हजार ७६२ रुग्णांची, तर खासगी रुग्णालयांत ६४ हजार ३१० रुग्णांची नोंद झाली

Corona deprives tuberculosis mainstream; Significant decrease in the number of patients throughout the year | कोरोनामुळे क्षयरुग्ण मुख्य प्रवाहापासून वंचित; रुग्णांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय घट

कोरोनामुळे क्षयरुग्ण मुख्य प्रवाहापासून वंचित; रुग्णांच्या संख्येत वर्षभरात लक्षणीय घट

Next

स्नेहा मोरे

मुंबई : राज्यात २०१९च्या तुलनेत मागील वर्षभरात क्षयरोग रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात सरकारी आणि खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये मिळून २ लाख ३० हजार रुग्ण होते. यात घट होऊन वर्षभरात राज्यात १ लाख ६० हजार ७२ क्षयरोग असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. मात्र ही घट सकारात्मक नसून कोरोनाच्या महामारीमुळे क्षयरुग्ण शोध, निदान आणि उपचारांच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिल्याचे दिसून आले.

राज्यात मागील वर्षी सरकारी रुग्णालयांत ९५ हजार ७६२ रुग्णांची, तर खासगी रुग्णालयांत ६४ हजार ३१० रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सरकारी-पालिका रुग्णालयांत २१ हजार ७२८ आणि खासगी संस्थांमध्ये २१ हजार ६७२ क्षयरुग्णांची नोंद झाली असून एकूण ४३ हजार ४०० रुग्ण आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक अभ्यासानुसार, रोगनिदान, उपचार याबाबतीत सुधारणा करतानाच क्षयरोगासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज आहे. ‘पोषण’ उत्तम असल्यास प्रतिकारक्षमता उत्तम राहून क्षयरोग होण्याची शक्यता कमी होते. उत्तम पोषण हे क्षयरोगासाठी एक प्रकारची उत्तम ‘लस’ आहे. याकडे शक्यतो आपण पुरेसे लक्ष दिलेले नाही. क्षयरोगाच्या ५५ टक्के केसेस या कुपोषणाशी निगडित आहेत.

याविषयी, आरोग्य विभागाच्या क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. आर. एस. अडकेकर यांनी सांगितले, कोरोनामुळे मागील वर्षभरात रुग्णालय बंद होती; त्यामुळे क्षयरोग रुग्ण उपचारांच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन रुग्णांचे होणारे सर्वेक्षणही थांबले होते. परिणामी मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची रुग्णसंख्या कमी असलेली आढळून आली आहे. मात्र संसर्गाची तीव्रता कमी झाल्यानंतर शोध, निदान आणि उपचारांची प्रक्रिया पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त रुग्णांना उपचारांच्या प्रक्रियेत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

हे  कायम लक्षात ठेवा!

  • क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे व पूर्ण कालावधीसाठी (६ महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे.
  • अर्धवट वा चुकीच्या उपचारांनी क्षयरोगाचे जंतू बंडखोर होतात व रेझिस्टंट टीबी  हा घात क्षयरोग होतो. यासाठी दोन वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात व यात यशाची खात्री १०० टक्के देता येत नाही.
  • फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य आहे व दोन आठवड्यांहून अधिक खोकला, बारीक ताप, वजन घटणे, घाम येणे अशी याची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत.
  • रुग्णांनी स्वमनाने औषधे घेत राहण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांकडे वा शासकीय इस्पितळात जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रुग्णाचाही फायदा आहे व त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होईल.
  • कोंदट घरे, प्रदूषण, गर्दी, धूम्रपान-दारूसारखी व्यसने, कुपोषण, चुकीची जीवनशैली, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींचा अभाव क्षयरोगासाठी पोषक घटक आहेत. एड्स, मधुमेह झाल्यास क्षयरोग होण्याची शक्यता वाढते.

 

Web Title: Corona deprives tuberculosis mainstream; Significant decrease in the number of patients throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.