मुंबईतील घरांच्या भाडे करारांनाही कोरोनाचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:53 PM2020-05-12T17:53:44+5:302020-05-12T17:54:09+5:30

गेल्या वर्षी दररोज सरासरी ७७६ करार; यंदा ४२ दिवसांत जेमतेम २८ करार

Corona also adopts house rental agreements in Mumbai | मुंबईतील घरांच्या भाडे करारांनाही कोरोनाचे ग्रहण

मुंबईतील घरांच्या भाडे करारांनाही कोरोनाचे ग्रहण

Next

 

मुंबई : शाळा महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी, कार्यालयांतील अंतर्गत बदल्या, नवी नोकरी, नवी शाळा अशा अनेक कारणांमुळे एप्रिल आणि मे महिन्यांत घर बदलण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु, कोरोनामुळे या स्थलांतरालाही ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत मुंबई शहरांत ४६,६०७ भाडे करार (दररोज सरासरी ७७६) नोंदविले गेले होते. यंदा १२ मे पर्यंत ती संख्या जेमतेम २८ पर्यंत पोहचल्याची माहिती हाती आली आहे.     

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ई रजिस्ट्रेशनसह २२ हजार ८१२ भाडे करार (लिव्ह अँण्ड लायसन्स) झाले होते. त्यातून सरकारला ९ कोटी ९४ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या २७ करारांपोटी फक्त ४३ हजार रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यांत झालेल्या २३ हजार ७९५ करारांमुळे ९ कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला होता. यंदा १२ मे पर्यंत अवघ्या एका कराराची नोंदणी झाली असून प्राप्त महसूल आहे ४२३ रुपये !

कोरोनामुळे प्रत्येकावर आर्थिक अरिष्ट कोसळले असून भविष्याच्या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. त्यामुळे कुणीही घर बदलण्याच्या मानसिकतेत नाही. ज्यांना घर बदलणे अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी ई रजिस्ट्रेशनचा पर्याय आहे. मात्र, इस्टेट एजंट ते काम करण्यासाठी घराबाहेर पडण्याची हिम्मत दाखवू शकत नाही. तसेच, त्या नोंदणीसाठी मशिनवर थम्ब इम्प्रेशन गरजेचे असते. ते करण्यास कुणी धजत नाही. त्यामुळे सारे व्यवहार थंडावले असून इस्टेट एजंट अक्षरश: रडकुंडीला आल्याची माहिती शांती रिअँलेटर्सच्या रचीत झुनझुनवाला यांनी दिली. तसेच, ज्यांचे भाडे करार संपले आहेत त्यांनी सहमतीने काही महिन्यांसाठी मुदत वाढवल्याचेही त्यांनी सांगितले.

गृह खरेदी – विक्री शुन्यावर   

नव्या घरांच्या खरेदी विक्रीची चर्चा सर्वत्र असली तरी जुन्या घरांचे व्यवहारही (रिसेल) याच दोन महिन्यांत प्रामुख्याने होत असतात. गेल्या वर्षी मुंबईत एकूण घरांच्या खरेदी विक्रीचे १२ हजार २२० व्यवहार झाले होते. त्यांच्या मुद्रांक शुल्कापोटी ९९३ कोटींचा महसूल सरकारला मिळाला होता. यंदा लाँकडाऊनमुळे या दोन महिन्यांत एकही व्यवहाराची नोंदणी झाली नसून महसूलानेही भोपळा फोडलेला नाही.

Web Title: Corona also adopts house rental agreements in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.