मुंबई : मुंबईकरांना ‘बेस्ट’ सेवा देणा-या बेस्टमध्ये तब्बल १ हजार ४९० कोरोनाची प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी १ हजार १५२ कर्मचारी बरे झालेत. हे प्रमाण ७७ टक्के आहे. मात्र यामध्ये किती कोरोनाग्रस्त कर्मचा-यांचा मृत्यू झाला? ही माहिती देण्याबाबत बेस्ट प्रशासनाने टाळटाळ केली आहे. पुन:श्च हरिओमनंतर मुंबईची बेस्ट बस आणखी वेगाने धावू लागली. मात्र वेग वाढविताना बेस्ट बसने कोरोनाला हरविण्यासाठी आपल्या कर्मचा-यांसह प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. परिणामी बेस्ट बसच्या रांगासह बसमध्ये सामाजिक अंतरांचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. या कारणात्सव बेस्टच्या चालकापासून वाहकापर्यंत आणि प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट बस नियमित व वेगाने धावत आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईपर्यंत बेस्ट बस सेवा देत आहे. सगळ्या बेस्ट बस रस्त्यावर धावत आहे. स्टाफ आला की बेस्ट रस्त्यावर उतरते आहे. बेस्ट वेळापत्रकाप्रमाणे धावते आहे. प्रत्येक आगारात प्रत्येक बस सॅनिटाइज केली जाते. मात्र बेस्ट बस दिवसातून एकदाच सॅनिटाइज होते. असे होता कामा नये. प्रत्येक फेरीला बेस्ट बस सॅनिटाइज झाली पाहिजे. असे केले तर वाहक, चालक आणि प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहील. मात्र याबाबत बेस्ट बसचे दूर्देव आहे. कारण शेतकरी किटकनाशक फवारण्यासाठी ज्या पध्दतीने मशीन वापरतात; तसे मशीन बेस्ट बसच्या सॅनिटाइजसाठी वापरले जाते. हे चुकीचे आहे. चीनमध्ये ज्या पध्दतीने बस सॅनिटाइज होते; त्याप्रमाणे बेस्ट बस सॅनिटाइज झाली पाहिजे. बेस्ट बसचे उच्च दर्जाचे सॅनिटाइज झाले पाहिजे. मात्र ते होत नाही. गेल्या पाच एक महिन्यांपासून बेस्ट समितीची एकही बैठक झालेली नाही. महिन्याला दोन बैठका म्हटल्या तरी पाच महिन्यात दहा बैठका होणे गरजेचे होते. बैठका झाल्या तर आम्ही बेस्टचे प्रश्न प्रशासनासमोर मांडू शकतो. मात्र प्रशासन बैठकाच घेत नाही. चालक, वाहकांसह बेस्ट कर्मचा-यांचे कोरोनामुळे मृत्यू होत असून, मृत कर्मचा-यांचा आकडा प्रशासन लपवते आहे.