कोरोना : १४ वर्षीय प्रियंका ३ महिने एकटीच राहिली; आणि त्यानंतर कुटुंबाला भेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 13:59 IST2020-08-30T13:59:14+5:302020-08-30T13:59:42+5:30
धारावीच्या कॉलनीत घरात एकटीच अडकली.

कोरोना : १४ वर्षीय प्रियंका ३ महिने एकटीच राहिली; आणि त्यानंतर कुटुंबाला भेटली
मुंबई : प्रियंका गुप्ता. १४ वर्षांची मुलगी. धारावीच्या कॉलनीत घरात एकटीच अडकली. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवसांपुर्वीच एका नातेवाईकाच्या अकाली मृत्यूमुळे प्रियंकाचे संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी गेले होते. मात्र, इयत्ता नववीची परीक्षा असल्याने प्रियंकाला मुंबईतच राहावे लागले. एका आठवड्यात तिचे पालक परत येण्याची तिची अपेक्षा होती. परंतु, लॉकडाऊनच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे प्रियंकाला तिच्या कुटुंबियांपर्यत पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शेजारी किंवा नातेवाईक नसल्याने मुंबईत स्वताच्या घरात अडकून पडल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र केलेल्या कित्येक प्रयत्नानंतर ३ महिने उलटून गेल्यनानंतर तिला आपल्या कुटूंबाला भेटता आले आहे.
प्रियांकासमोर दोन मुख्य समस्या उद्भवल्या. त्या म्हणजे कोविडची प्रकरण त्या भागात झपाट्याने वाढत होती तर दुसरीकडे तिला सुरक्षिततेबद्दलही चिंता वाटत होती. तिला दररोज रात्री एकटे झोपावे लागत होते. प्रियंकाने पाच वेळा पोलिसांकडून मदत मागितली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त कधी होईल याची माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी तिला सांगितले. पण काही झाले नाही. त्याऐवजी त्यांनी तिला काही रेशन दिले आणि एका आश्रयस्थानात स्थालांतरित करण्याबाबत सांगितले. मात्र एकटे राहणे आणि गर्दीपासून दूर राहणे तिला चांगले वाटले. तिचे वडील कित्येक महिन्यांपासून प्रत्येक संभाव्य स्रोताकडून फोन आणि मदत मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मुलीला घेऊन येण्यासाठी मुंबईला जावे यासाठी ते परवानगी व साधन शोधत होते. ते म्हणाले, मी सर्वांना कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही मदत केली नाही. प्रियंका धारावीमध्ये एकटीच राहिल्यामुळे तिचे रेशन एकदा संपले होते. सुदैवाने, तिच्या वडिलांनी चाईल्डलाइन हेल्पलाइन १०९८ वर कॉल केला आणि युवा अर्बन इनिशिएटिवटीमने तातडीने तिला एका दिवसाच्या आत रेशन दिले आणि तेव्हापासून तिच्याशी नियमित संपर्क ठेवला.
तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये तिच्या शेजारच्या एका वृद्ध व्यक्तीने प्रियंकाला इलाहाबाद सोडू असे सांगितले. तो एक अज्ञात व्यक्ती होता. ज्याने प्रियंकाच्या परिस्थितिबद्दल ऐकले होते. लवकरच, प्रियंका इतर स्थलांतरित कामगारांच्या गटासह, तीन दिवसांच्या प्रवासाला निघाली. ती तिच्या शेजा-यासह धारावीहून टॅक्सीने भिवंडीला गेली. ३०-४० इतर लोकांसह भिवंडीहून ती एका ट्रकमध्ये चढली. ट्रकमध्ये दोनच महिला होत्या. छोटी मुले नव्हती. सुदैवाने, ट्रकमध्ये सर्व दयाळू होते. ट्रकमधील सर्वानी तिला पूर्ण आहार व पाणी पुरवठा केला. कुटुंबापर्यंतचा हा प्रवास तिच्यासाठी निश्चितपणे आव्हानात्मक होता. तीन दिवस ट्रकमध्ये झोपायला जागा नव्हती आणि उत्तर भारतातील प्राणघातक उन्हाळ्यात प्रवास केला जात होता. तथापि, प्रियंकाने केवळ १४ वर्षांची असूनही स्वतःहून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. प्रवासात गंभीर जोखीम घेऊन ती तिच्या पालकांकडे परत गेली आणि सुदैवाने अनोळखी व्यक्तींचे पाठबळ आणि सहानुभूती मिळाल्याने हे शक्य झाले, असे युवा संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक नामदेव गुलदगड यांनी सांगितले.