Join us
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 07:06 IST

अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते क्वॉरंटाइन झाले आहेत, ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे सोमवारपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षाविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. मात्र, पूर्ण अधिवेशन काळात अध्यक्ष आलेच नाहीत, असे याआधी कधीही घडलेले नाही. पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद आहे. तसेच ते फोनवर येऊ शकणार नाहीत, असे त्यांच्या निवासस्थानी सांगण्यात आले. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे.

फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रत्येक आमदार तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी केल्यानंतरच आत जाता येईल. सदस्यांची बैठक व्यवस्था देखील बदलली आहे. एका सदस्यानंतर दोन सदस्यांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले जाणार आहे.

प्रश्नोत्तरे, लक्षवेधी नाही

पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोकप्रस्ताव चर्चेला येणार आहेंत. त्यानंतर सरकारच्यावतीने काही विधेयके मांडली जातील. दुसºया दिवशी विधेयके आणि पुरवणी मागण्यावर चर्चा होईल. दोन दिवसांचे हे अधिवेशन असेल. अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी असा कोणताही कार्यक्रम नाही असेही संसदीय कार्यमंत्री परब म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकारविधानसभा