Join us  

कंगना रनौतच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून वादंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 2:06 AM

कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत असून विमानतळावर उतरताच तिच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

नवी दिल्ली/ मुंबई : शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर कंगना रनौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

शहा यांचे मानले आभार

कंगनाला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी तिच्या वडीलांनीही केली होती. या निर्णयाबद्दल कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानत म्हटले आहे की, एका देशभक्ताचा आवाज आता कोणीही दडपू शकणार नाही. सध्याची स्थिती पाहता मी आता नव्हे तर आणखीन काही दिवसांनी मुंबईला जावे असे शहा मला सुचवू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी या देशाच्या कन्येला दिलेला शब्द पाळला.

विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या कंगना रनौतविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यानंतर अध्यक्षांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याचा २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सुनावले

अनेकजण इतर प्रांतातून मुंबई महाराष्ट्रात येतात. येथे रोजीरोटी कमवतात. नाव कमवतात. त्यातील काही जण महाराष्ट्राचे ऋण मानतात तर काही जण मानत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता कंगनाला सुनावले.

मुंबई पोलिसांंनी तिला संरक्षण दिले असते

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नाही अशी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा अवमान करणाºया व्यक्तीला केंद्र सरकार वाय प्लस दर्जाची सुरक्षा देते, ही बाब चिंतेची आहे. महाराष्ट्र जेवढा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा आहे तेवढाच तो भाजपचाही आहे. त्यामुळे राजकारणासाठी महाराष्ट्राचा अवमान करणाºया व्यक्तीला असे संरक्षण देणे धक्कादायक आहे. कंगना आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शंभर टक्के संरक्षण दिले असते.- अनिल देशमुख, गृहमंत्री

तिच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारणार - महापौर

कंगना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत असून विमानतळावर उतरताच तिच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयाची महापालिका अधिकाऱ्यांनी पहाणी केली. कदाचित या कार्यालयाचा काही भाग पाडला जाण्याची शक्यता आहे. तशी भीती कंगनाने व्यक्त केली.

टॅग्स :कंगना राणौतउद्धव ठाकरेपोलिस