"उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...!" उत्तर भारतीय सेनेचा ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न, मातोश्रीबाहेर वादग्रस्त बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:01 IST2025-11-05T11:46:31+5:302025-11-05T12:01:25+5:30
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर लावण्यात आले आहेत.

"उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...!" उत्तर भारतीय सेनेचा ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न, मातोश्रीबाहेर वादग्रस्त बॅनर
Matoshree Banner: मुंबई महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. याची सुरुवात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर लावलेल्या बॅनवरुनच होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय सेनेने लावलेल्या बॅनरवरुन उद्धव आणि राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याआधीही उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला होता. त्यानंतर बटोगे तो पिटोगे असं म्हणत सुनील शुक्ला यांनी उत्तर भारतीयांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाषेच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच उत्तर भारतीय सेना नावाच्या संघटनेने मातोश्रीबाहेर लावलेल्या बॅनरमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मातोश्री, शिवसेना भवन आणि अंधेरी स्थानकाच्या बाहेर हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर हिंदी भाषेत मोठ्या अक्षरात "उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...! असे लिहीले आहे.
या बॅनरवर 'महाराष्ट्र से बिहार तक राजस्थान से युपी तक' असेही नमूद केले आहे, ज्यावरुन उत्तर भारतीय समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. या बॅनरवर 'उत्तर भारतीय सेना' असा उल्लेख असून त्यावर सुनील शुक्ला यांचाही फोटो आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न
या बॅनरमागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा मराठीचा मुद्दा उपस्थित करत मराठी भाषेविषयी टीका करणाऱ्या परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत उत्तर भारतीय सेना हे बॅनर लावून उत्तर भारतीय समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. याआधीही उत्तर भारतीय विकास सेनेचे सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला होता.
आगामी काळात भाषिक राजकारण तापणार
या बॅनरमुळे येणाऱ्या काळात मुंबईतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. 'मराठी विरुद्ध परप्रांतीय' असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकांवर निश्चितपणे दिसून येईल. उत्तर भारतीय मतांना आकर्षित करण्यासाठी किंवा मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.