Join us

ब्लॅकलिस्ट कंपन्यांना अधिक दराने कंत्राट? कंत्राटात संगनमत झाल्याचा बाळा नांदगावकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:27 IST

ठराविक ब्लॅकलिस्ट कंपन्यांनाच हे काम देऊन पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत दरवर्षी होणाऱ्या नालेसफाईत यंदाही अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने घोटाळा होत आहे. मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी अंदाजित दरापेक्षा जास्त दर आकारून काम मिळवण्याचा प्रयत्न कंत्राटदारांनी केला आहे. ठराविक ब्लॅकलिस्ट कंपन्यांनाच हे काम देऊन पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला असल्याचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी केला.

गाळ काढण्यासाठी आवश्यक जी शिल्ट पुशअप मशिन वापरण्यात येते तिची किंमत केरळ येथे ९० लाख रुपये आहे. मात्र, या मशिनचे मालक केतन कदम असून, त्यांची एनओसी आणली तरच त्या कंत्राट काम देण्यात येईल. त्यासाठी मशिन पुरवठादार मात्र वर्षभरात ९ कोटी रुपये भाडे आकारतो, असा आरोप नांदगावकर यांनी केला.

नालेसफाईत एकाच कंत्राटदाराच्या चार कंपन्या

पालिकेत नालेसफाई कामांसाठी कंत्राट मिळविणाऱ्या डी.बी. इंटरप्रायझेस, एमएस रनोजा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्रिदेव इन्फ्रा प्रोजेक्ट, तनिषा इंटरप्रायझेस आदी कंपन्या या एकाच कंत्राटदाराच्या आहेत, असा दावा बाळा नांदगावकर यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांनी अधिक दराने निविदा भरणाऱ्या कंपन्यांचा इतिहास काढून यापूर्वी त्यांनी किती लूट केली आहे, याची माहिती घ्यावी. या प्रकरणाची पूर्णतः एसआयटी नेमून चौकशी करावी व या कंपन्यांचे मालक दोषी आढळल्यास ब्लॅकलिस्ट करून गुन्हे दाखल करावे. - बाळा नांदगावकर, मनसे नेते.

 

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामुंबई महानगरपालिका