‘बेस्ट’ला कंत्राटदाराकडून ६,५५५ पैकी केवळ २,१६४ बसचा पुरवठा

By सीमा महांगडे | Updated: May 22, 2025 14:54 IST2025-05-22T14:54:26+5:302025-05-22T14:54:38+5:30

बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे.

Contractor supplies only 2164 buses out of 6555 to BEST | ‘बेस्ट’ला कंत्राटदाराकडून ६,५५५ पैकी केवळ २,१६४ बसचा पुरवठा

‘बेस्ट’ला कंत्राटदाराकडून ६,५५५ पैकी केवळ २,१६४ बसचा पुरवठा

मुंबई : सध्याच्या घडीला बेस्ट उपक्रमात स्वमालकीच्या ५५६, तर भाडे तत्त्वावरील २ हजार ११९ अशा एकूण फक्त २ हजार ६७५ बसचा ताफा आहे. २०१८ पासून २०२४ पर्यंत बेस्ट उपक्रमाकडून भाडे तत्त्वावरील गाड्यांसाठी तब्बल ६ हजार ५५५ बसची ऑर्डर दिली आहे. मात्र, त्यातील केवळ २ हजार १६४ म्हणजेच ३३ टक्के बसेसचाच पुरवठा कंत्राटदारकडून झाल्याची माहिती समोर आली आहे. 

बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे.  २००९ साली बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ४,०३७ बसेस होत्या. आता त्यात घट होऊन बसची संख्या २ हजार ६०० वर आली आहे. त्यात तब्बल १ हजार ३६२ गाड्यांची घट झाली आहे.  बेस्ट उपक्रमाकडून वेळेत बस न पुरविल्याने कंत्राटदाराला यापूर्वी नोटीसही बजावली आहे.

मागणी पुरवठ्यातील अंतर आणि अपुऱ्या बस ताफ्यामुळे बस प्रवाशांना करावा लागणारा गर्दीचा सामना, तासन् तास बसथांब्यावर ताटकळत उभे राहणे, यामुळे वाहतूक तज्ज्ञांनीही बेस्ट बस भाडेवाढीला विरोध दर्शविला होता. मात्र, बेस्ट बस भाडेवाढीनंतरही उपक्रमात कोणतीही सुधारणा नसून उलट बसच्या ताफ्यातील घट वाढत असल्याचे दिसून येत आहे.

९० टक्क्यांपेक्षा अधिक बस भाडे तत्त्वावरील 
सध्या बेस्टच्या मालकीच्या बसचा ताफा झपाट्याने कमी होत असून, डिसेंबर २०२५ अखेर २५० पेक्षा कमी बस सेवेत राहतील. त्यामुळे २०२६ या वर्षात ९० टक्क्यांपेक्षा जास्त ताफा भाडेतत्त्वावरील बसचाच असेल, असेही सांगण्यात आले.

बस भाडेवाढ करता आणि दुसरीकडे पुरेसा ताफा ही नसेल, तर बससेवा चालणार कशी? स्वमालकीच्या नाही, पण किमान ऑर्डर दिलेल्या भाडे तत्त्वावरील बस तरी ताफ्यात आणून प्रवाशांना दिलासा द्या. प्रवाशांना आरामदायी प्रवास द्यायचा असेल, तर ताफा वाढविणे हा एकच पर्याय आहे 
रूपेश शेलटकर, 
आपली बेस्ट आपल्यासाठी

भाडे तत्त्वावरील बस 
बसचा प्रकार    मागणी     पुरवठा 
मिडी नॉन एसी ई बस    २०    २०
मिडी एसी ई बस    २०    २०
मिडी सीएनजी    ६२५    ६२५
एसडी एसी ई बस    १४०    १४०
मिडी एसी ई बस    २००    २००
एसडी नॉन एसी सीएनजी    ६००    ५८६
डबल डेकर एसी    २००    ५०
एसडी एसी ई बस    २,१००    ५२३
एसडी एसी ई बस    २५०    ०
एसडी एसी ई बस    २,४००    ० 

Web Title: Contractor supplies only 2164 buses out of 6555 to BEST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.