एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:33 IST2025-01-07T07:31:09+5:302025-01-07T07:33:25+5:30

एन. डी. स्टुडिओत व्यावसायिक, निर्माते आल्यास स्टुडिओ सक्षम होणार

Consultant appointed for ND Studio growth suggestions for some changes by Ashish Shelar | एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार

एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवंगत सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथे उभारलेल्या एन. डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण करून तेथे व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावा. जेणेकरून त्यांच्या माध्यमातून योग्य बदल आणि व्यावसायिक पद्धतीचा  कृती आराखडा तयार करून स्टुडिओची आर्थिक सक्षमता अधिक वाढविता येईल, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केल्या आहेत. एन. डी. स्टुडिओत  व्यावसायिक, निर्माते आल्यास  स्टुडिओ सक्षम होणार आहे.

वरिष्ठ अधिकारी उपस्थित

  • मंत्रालयात सोमवारी आयोजित एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामाच्या आढावा बैठकीत शेलार यांनी संबंधिताना सूचित केले. 
  • यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी  तसेच एनडी स्टुडिओचे  संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कलाकारांना आवश्यक सुविधा पुरवा

या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने पर्यटक, व्यावसायिक, निर्माते यांचा वावर वाढला पाहिजे, यादृष्टीने नूतनीकरण करावे.मराठी सिरियल्स, सिनेमा,  ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सूचनाही मंत्री शेलार यांनी दिल्या.

स्थानिकांना प्राधान्य द्यावे

  • देसाई यांच्या निधनानंतर एन. डी. स्टुडिओ राज्य सरकारने जतन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. या स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील सिनेमा व मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करावे. 
  • याच्या परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करण्यास भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. स्टुडिओत रिकाम्या जागेचा योग्य वापर करावा, असे शेलार यांनी सांगितले.

Web Title: Consultant appointed for ND Studio growth suggestions for some changes by Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.