वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी भांडुपमध्ये ३२५ टन स्पॅनची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:39 IST2026-02-03T14:38:06+5:302026-02-03T14:39:20+5:30
एमएमआरडीएकडून आणखीन एक अवघड टप्पा पार; मेट्रो ४ मार्गिकेच्या कामांना गती

वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी भांडुपमध्ये ३२५ टन स्पॅनची उभारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवर भांडुप पश्चिम येथे एकूण ३२५ मेट्रिक टन वजनाचे ३ भव्य स्टील स्पॅनची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यशस्वीरित्या उभारणी केली. त्यातून या मार्गिकेने आणखी एक अवघड टप्पा पार केला आहे.
मेट्रो ४ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेच्या कामांना आता वेग आला आहे. या मेट्रोची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर एमएमआरडीएचा भर आहे. दुसऱ्या टप्प्यात या मेट्रोचा कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा मार्ग प्रवासी सेवेत आणला जाणार आहे. त्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यातील स्थापत्य कामांवर एमएमआरडीएने भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून नुकताच भांडुप पश्चिमेला ३ स्टील स्पॅनची उभारणी करण्यात आली.
सततची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने एमएमआरडीएने उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे अवघ्या दोन रात्रींमध्ये काम केले. मेट्रो ४ ही ३२.३२ किमी, तर मेट्रो ४अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके असतील. यातील पहिल्या टप्प्यात या दोन्ही मेट्रो मार्गिकांवर मिळून गायमुख ते कॅडबरी जंक्शन या १०.५ किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे.
कोणती साधने वापरली?
एमएमआरडीएने या स्टील स्पॅनच्या उभारणीसाठी उच्च क्षमतेच्या ८ हेवी ड्यूटी क्रेन्सचा वापर केला. तसेच १२ मल्टी ॲक्सेल वाहनांच्या साहाय्याने हे स्टील स्पॅन्स अत्यंत अचूकपणे आणि कौशल्याने बसवण्यात आले. या कामासाठी ३५ अभियंते, १०० हून अधिक कुशल कामगार, ७० वाहतूक वॉर्डन आणि २५ हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मार्गावर १० स्थानके
पहिल्या टप्प्यात मेट्रो मार्गावर १० स्थानके असून कॅडबरी जंक्शन, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, गोवनीवाडा, कासारवडवली, आणि गायमुख या स्थानकांचा समावेश असेल.