संविधान हाच धर्म, अंनिसची राज्यस्तरीय अधिवेशनातील भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:52 AM2019-08-11T05:52:09+5:302019-08-11T05:52:29+5:30

भारतात आतापर्यंत अनेक महापुरुषांनी धर्माच्या नवनवीन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आज भारतीयांसाठी संविधान हाच धर्म असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

The Constitution itself is the religion | संविधान हाच धर्म, अंनिसची राज्यस्तरीय अधिवेशनातील भूमिका

संविधान हाच धर्म, अंनिसची राज्यस्तरीय अधिवेशनातील भूमिका

Next

मुंबई : भारतात आतापर्यंत अनेक महापुरुषांनी धर्माच्या नवनवीन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आज भारतीयांसाठी संविधान हाच धर्म असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

अंनिसचा देव-धर्माला विरोध नाही. तर अंनिस धर्मचिकित्सेचे कार्य करते. २० आॅगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. म्हणून २० आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून घोषित करण्यात यावा यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करीत आहोत, असे पाटील या वेळी म्हणाले. ते असे कोणते कार्य करीत होते की त्यांची हत्या करण्यात आली? हे दाभोलकरांच्या हत्येनंतर जाणून घेण्याची तरुणांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात अनेक तरुण जोडले गेले. जगभरात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे अंनिससारखे दुसरे कोणतेच संघटन नाही. त्यामुळे अंनिस वैश्विक पातळीवर काम करण्याचा संकल्प करणार असल्याचे ते म्हणाले. मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये दंगली उसळल्या त्या वेळी अंनिसचे कार्यकर्ते वातावरण निवळण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे अंनिस धर्मचिकित्सेसोबतच धर्मनिरपेक्षिततेसाठीदेखील काम करीत आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अंनिस मदत करणार असल्याचेही त्यांनी संगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवारी मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिर येथे आयोजित अधिवेशनाला राज्यभरातील अंनिसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विवेक जागर विशेषांक, पृथ्वीमोलाचा माणूस व महाराष्ट्र अंनिस त्रिदशकाची दमदार वाटचाल या तीन पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख वक्ते गजानन खातू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, दाभोलकर आणि मी खूप वेळ एकत्र असायचो. दाभोलकर हे उत्तम कबड्डीपटू होते. दाभोलकर यांनी शेवटच्या काळात तरुणांना आपल्या चळवळीत जवळ केले; कारण त्यांना तरुणांवर अधिक विश्वास होता. एखाद्या चळवळीला ३० वर्षे पूर्ण होणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे काम करीत असताना दाभोलकरांच्या विरोधात अनेक धार्मिक व आर्थिक शक्ती उभ्या राहिल्या. चळवळीसाठी यानंतरचा टप्पा खडतर असणार आहे. त्यामुळे चळवळीला बदलत्या काळानुसार अभ्यासाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

‘अवयवदान करा’
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार म्हणाले की, फक्त भाषण देऊन चालणार नाही, तर कृती करणे गरजेचे आहे. रक्षाबंधनाला झाडांना राखी बांधा. गणपती व नवरात्र ज्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते तसे आता काहीच राहिले नाही. पहिल्याच्या तुलनेत गणपती व नवरात्र यांचे स्वरूप वेगळे आहे. माणूस जिवंत ठेवण्यासाठी अवयवदान करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
 

Web Title: The Constitution itself is the religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत