Join us

खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 06:51 IST

एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, शेखने त्याच्या सह-आरोपींना त्याचा सेल फोन आणि सिम कार्ड नष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई : कोणताही सामान्य, निर्दोष माणूस आपला सेल फोन आणि सिम कार्ड नष्ट करण्याचे कोणतेही कारण असू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने २०२१ मध्ये एटीएसने कथित दहशतवादी कट रचल्याप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

आरोपी जाकीर शेख या ऑटोरिक्षा चालकाला एटीएसने ताब्यात घेतले होते. आपल्याला अटक करून चार वर्षे झाली. तरीही खटला सुरू झाला नाही, असे कारण देत शेखने जामिनावर सोडण्याची मागणी केली. गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे, दहशतवादाविरोधी कायद्यासंबंधित कलमांसह बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यातील कलमांतर्गत शेखवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एटीएसने केलेल्या दाव्यानुसार, शेखने त्याच्या सह-आरोपींना त्याचा सेल फोन आणि सिम कार्ड नष्ट करण्याचे निर्देश दिले होते. फोनचे आणि सिमचे इतके तुकडे करून नष्ट करण्यात आले होते की, मुंबई आणि हैदराबादच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतील तज्ज्ञांना त्यातून काहीही मिळू शकले नाही.

काय म्हणाले न्यायालय?

‘प्रथमदर्शनी आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येते. कोणताही सामान्य माणूस सिम कार्ड आणि सेल फोन नष्ट करण्याचे काहीही कारण असू शकत नाही. त्याचे इतके तुकडे करण्यात आले की, एफएसएलच्या तज्ज्ञांनाही त्यातून काही मिळाले नाही. आरोपीने सेल फोन आणि सिम कार्ड नष्ट करण्याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही,’ असे निरीक्षण नोंदवीत विशेष न्यायालयाचे न्या. व्ही. बाविस्कर यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस