जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:07 IST2025-01-07T06:06:26+5:302025-01-07T06:07:17+5:30
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी परिसरात सिद्दिकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली.

जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्या गँगचा दबदबा निर्माण व्हावा यासाठी बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल याने अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे आदेश दिले, असे पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. पोलिसांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल केले.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील खेरवाडी परिसरात ६६ वर्षीय बाबा सिद्दिकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून त्यात शिवकुमार गौतम याचा समावेश आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणातील अन्य आरोपी अनमोल बिश्नोई, मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर अद्याप फरार आहेत. यासंदर्भात पोलिसांनी मकोका न्यायालयात ४ हजार ५९० पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात २९ आरोपींविरोधात सबळ पुरावे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १८० साक्षीदारांची नोंद करण्यात आली असून ८८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांनी पाच पिस्तूल, सहा मॅगझीन आणि ३५ मोबाइल जप्त केले आहेत. बिश्नोई टोळीची उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांत दहशत आहे. अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी अनमोल बिश्नोईविरोधात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लुकआऊट नोटीस जारी केली होती.