क्यार व महा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 19:43 IST2020-08-26T19:43:02+5:302020-08-26T19:43:42+5:30
मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली रु.६५ कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा

क्यार व महा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा
मुंबई : कोकण किनारपट्टीवर गेल्या २०१९ च्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या 'क्यार' व 'महा'चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मच्छीमारांना दिलासा देणारा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. चक्रीवादळांचा फटका बसलेल्या मच्छीमारांसाठी रु.६५ ,१७,२०,००० च्या आर्थिक पॅकेजची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.
क्यार व महा चक्रीवादळांमुळे सन २०१९-२०२० च्या प्रमुख मासेमारी हंगामात (२४ ऑक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९) वादळी हवामानामुळे मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. राज्य सरकारने या पॅकेजद्वारे मच्छीमारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती अस्लम शेख यांनी लोकमतला दिली. सदर पॅकेजचा लाभ रापणकार संघाचे सभासद, बिगर यांत्रिक नौकाधारक, १-२ सिलेंडर नौकाधारक, ३-४ सिलेंडर नौकाधारक, ६ सिलेंडर नौकाधारक यांना मिळणार आहे लहान मासळी विक्रेता मच्छीमारांना ५० लिटर क्षमतेच्या शितपेट्यांसाठी अनुदान देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.