“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:55 IST2025-12-26T17:49:56+5:302025-12-26T17:55:38+5:30
Congress Vijay Wadettiwar News: भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो. प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते असतील तर २०२९ वर्ष काँग्रेसचेच असेल, असा दावा यावेळी करण्यात आला.

“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, प्रशांत जगताप हे राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्या बरोबर काम करत होते. प्रशांत जगताप यांनी जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही ठाम भूमिका घेतली व काँग्रेस पक्षात प्रवेश केला, विचारांशी बांधिलकी अशी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर विचारांशी तोडजोड न करणारे ते नेते आहेत. त्यांना अनेकांनी ऑफर दिली, थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत जगताप यांनी पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही, असे नेते असतील तर २०२९ आपले असेल, असा विश्वास वडट्टेवार यांनी व्यक्त केला.
जातीवादी व भ्रष्टाचाराविरोधात लढाई
प्रशांत जगताप यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्ष आहे १३५ वर्षांचा जुना पक्ष असून अथांग महासागर आहे कितीही वादळे आली तरी काँग्रेस पक्ष हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता असून शिव शाहू फुले आंबेडकर, गांधी व नेहरु विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माझी लढाई जातीवादी व भ्रष्टाचाराविरोधात आहे. भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो, असे जगताप म्हणाले.
दरम्यान, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा व काँग्रेस पक्ष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय पक्ष हे विचारधारेवर काम करत असतात आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे. पण आज काही पक्ष हे केवळ सत्ता व सत्तेतून भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे व त्या पैशातून निवडणुका जिंकणे हे काम करत आहेत. पैसा फेक व तमाशा देख हे वगनाट्य जोरात सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा देशाला तारणारी आहे आणि प्रशांत जगताप यांनी काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केला आहे, त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.