परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:55 AM2019-08-21T04:55:32+5:302019-08-21T04:55:41+5:30

भाजपचा उमेदवार कोण असणार यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

 Congress try to be again win of Constituency | परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड

परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड

Next

- गौरीशंकर घाळे

मुंबई : विधान भवन, राजभवन, मंत्रालय अशा महत्त्वाची शासकीय आस्थापनांचा समावेश असणारा मतदारसंघ म्हणजे कुलाबा. ब्रिटिशकालीन वास्तू आणि तसाच तोंडवळा असणारा मोठा परिसर या मतदारसंघात आहे. देशी-विदेशी पर्यटकांचा वावरही इथे असतो. त्यामुळे हा मतदारसंघ कॉस्मोपॉलीटन असल्याचा दावा अनेकदा केला जातो. बऱ्याच अंशी त्यात तथ्य असले तरी डझनभर कोळीवाडे आणि झोपडपट्ट्यासुद्धा याच मतदारसंघात आहेत. टोलेजंग इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंवर भाळणाºया अनेकांना या मतदारसंघाची ही दुसरी बाजू खचितच स्मरते. एकीकडे कॉस्मोपॉलीटन वर्ग आणि दुसरीकडे झोपडपट्ट्या अशा दुहेरी तोंडवळ्याच्या या मतदारसंघाने कायमच काँग्रेसची पाठराखण केली. १९७८ साली जनता पार्टीचे उमेदवार रणजीत भानू आणि त्यानंतर थेट २०१४ सालच्या मोदी लाटेत भाजपचे राज पुरोहित कुलाब्यातून निवडून आले. हे दोन अपवाद सोडल्यास या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारच सातत्याने विजयी होत आले. २०१९ च्या लढतीत हा परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मुंबई काँग्रेसमधील न संपणारा गोंधळ, त्यामुळे कमकुवत झालेली संघटना आणि उमेदवारीबाबतचा संभ्रम, ही सध्याची काँग्रेसची लक्षणे पक्षाच्या सुदैवाने कुलाब्यात आढळत नाहीत. काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार भाई जगताप या मतदारसंघातून प्रयत्नशील आहेत. दीड दोन वर्षांपासून त्यांनी जाणीवपूर्वक आपला आमदार निधी कुलाबा मतदारसंघाकडे वळविला. मतदारसंघातील प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेत आपली राजकीय दिशा त्यांनी आधीच स्पष्ट केली आहे. अ‍ॅनी शेखर यांच्या निधनानंतर काँग्रेस उमेदवार कोण, हा प्रश्न भाई जगताप यांच्यामुळे निकाली निघाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू असताना विरोधी गटाने काँग्रेसबाहेरचा उमेदवार लादत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भाई जगताप हे मतदारसंघातील नाहीत, बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप भाजप आणि शिवसेनेकडून सुरू आहे. यापूर्वी खेतवाडीतून आमदार झाले तेव्हांही भाई जगताप यांना या आरोपांचा सामना करावा लागला होता. कामगार युनियन आणि विभागीय कॉँग्रेसमधील वावर जगताप यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरण्याची शक्यता आहे.
याउलट स्थिती भाजपममध्ये आहे. राज पुरोहित विद्यमान आमदार आहेत. मुंबादेवी, कुलाबा अशा दक्षिण मुंबईतील विविध मतदारसंघांतून राज पुरोहित आमदार म्हणून निवडून आले. २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी मुंबई अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ साली त्यांनी कुलाब्यातून निवडणूक लढविली. काँग्रेस उमेदवार अ‍ॅनी शेखर यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. २०१४ साली त्यांनी अ‍ॅनी शेखर यांचा पराभव करीत पुन्हा एकदा विधानसभा गाठली. पहिल्या युती सरकारमध्ये मंत्रिपद, मुंबई भाजपचे अध्यक्षपद सांभाळणाºया पुरोहितांना यंदा पक्षांतर्गत आव्हानाला सामारे जावे लागत आहे. भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे तगडे आव्हान पुरोहितांसमोर आहे. भाई जगताप यांच्या उमेदवारीने काँग्रेस मराठी कार्ड खेळत आहे. त्याला नार्वेकर उत्तर ठरू शकतील, असा तर्क लढविला जात आहे. पुरोहित की नार्वेकर असा तिढा अद्याप सुटलेला नाही. पक्षाकडून याबाबत स्पष्ट घोषणा केली गेली नसल्याने दोन्ही नेते आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. गुजराती, मारवाडी मतदार आणि त्यांच्या विविध जाती संस्थांमधील पुरोहितांचा वावर, हॉटेल असोसिएशन आणि व्यापारी संघटनामध्ये पुरोहितांचा वरचष्मा आहे. शिवाय पाणी प्रश्न, पार्किंगबाबतचे धोरण आदी मुद्द्यांवर पुरोहित यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनेही केली होती. भाजपचा उमेदवार कोण असणार यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

- भाजप - शिवसेनेच्या जागावाटपात हा मतदारसंघ कायमच भाजपकडे राहिला. युती, आघाडीतील बिघाडीनंतर २०१४ साली सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. तेव्हा शिवसेनेकडून पांडुरंग सकपाळ यांनी दुसºया क्रमांकाची मते घेतली. तर, काँग्रेस तिसºया क्रमांकावर घसरली. अद्याप युतीचा निर्णय झालेला नाही. सकपाळ यंदा मुंबादेवी मतदारसंघातून प्रयत्नशील आहेत. युतीत बिघाडी झालीच तर शिवसेनेला सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीचे अरविंद सावंत मोठ्या फरकाने निवडून आले.

Web Title:  Congress try to be again win of Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.