Join us  

केंद्रीय पोलीस दलाचा वापर; मोठं षडयंत्र रचलं जातंय; नाना पटोले यांचा भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 2:07 PM

ईडीच्या या कारवाईवर नाना पटोले यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे.

नागपूर/ मुंबई- अनेक काँग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्या घरी गुरुवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ॲड. उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.  

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ईडीच्या या कारवाईवर नाना पटोले यांनी आज पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षाचा विरोध असू शकतो. मात्र मनाचा विरोध असू शकत नाही, असं नाना पटोले म्हणाले. 

मुंबईची ईडी येथे येऊन कारवाई करणे आणि केंद्रीय पोलीस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठं षडयंत्र येथे रचलेलं आहे, असा देखील आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, सतीश उके यांना ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर आज त्यांना विशेष ईडी कोर्टात हजर करणार आहेत. नागपूरमध्ये ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेऊन अॅड. सतीश उके यांना मुंबई आणण्यात आले आहे. ईडीकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांचे वकील अॅड. रवी जाधव यांनी केला आहे. 

अॅड. जाधव म्हणाले की, नागपूरमधील उके यांच्या घरी ईडीने छापा मारला. त्यानंतर काल सतीश उकेंना अटक करण्यात आली. नागपूरमध्ये त्यांना कोणत्याही कोर्टात हजर करण्यात आले नाही. याउलट त्यांना घेऊन सकाळच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले असल्याचा आरोप अॅड. जाधव यांनी केला. 

पुरावे नष्ट करण्यासाठी छापा -

ॲड. उके यांच्या लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. ते पुरावे नष्ट करण्यासाठीच हा छापा घातला गेला व लॅपटॉप जप्त केल्याचा आरोप प्रदीप उके यांनी केला.

असे आहे प्रकरण-

एका ६० वर्षीय महिलेने उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन बळकावल्याची तक्रार केली. गुन्हे शाखेने अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :नाना पटोलेअंमलबजावणी संचालनालयभाजपा