Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री राज्याचे नाही तर आरएसएसचे - अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:00 IST

महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसंदर्भात उच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास यंत्रणा व महाराष्ट्र सरकारने दाखवलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री राज्याचे आहेत की फक्त एका राजकीय पक्षाचे आहेत? असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. महाराष्ट्राकरिता ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, उच्च न्यायालयाला अशा तीव्र शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करावी लागली याचे कारण राज्याचे मुख्यमंत्री संविधानाप्रमाणे नाही तर संघाच्या विचारधारेनुसार काम करत आहेत. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री हे पूर्णपणे अपयशी व कार्यक्षम ठरले आहेत. संघ विचारधारा ही कायम संविधान विरोधी राहिलेली आहे. आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्याकरिता संघ कोणत्याही थराला जाऊ शकतो. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे कायम संघ विचारधारेच्या विरोधात लढले. त्यामुळेच त्यांच्या मारेक-यापर्यंत पोहोचण्यात सरकारला रस नाही असा आरोप चव्हाण यांनी केला. 

मुंबईजवळ नालासोपारा येथे सापडलेल्या बॉम्बसाठ्या प्रकरणी तपासाचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या सांगण्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत. असा गंभीर ठपका इंडिया स्कूप नावाच्या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्यांवर ठेवला आहे अशी माहिती अशोक चव्हाणांनी दिली. काँग्रेस पक्षाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण मागितले होते जे त्यांनी अद्यापही दिले नाही. उच्च न्यायालयाच्या वक्तव्यावरून हा रिपोर्ट सत्यच होता हे स्पष्ट झाला आहे असा दावा अशोक चव्हाणांनी केला.  

टॅग्स :महाराष्ट्रअशोक चव्हाणदेवेंद्र फडणवीसनरेंद्र दाभोलकरगोविंद पानसरेउच्च न्यायालय