Join us
Daily Top 2Weekly Top 5

अडाणीपणाची लेखनकामाठी करून हौस भागवू नये, काँग्रेसचा राऊतांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 15:20 IST

आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो याचेही भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मुंबई- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य करत टीकास्त्र सोडलं होतं. दुर्दैवानं आज विरोधी पक्ष मजबूत दिसत नाही, काँग्रेस पक्ष जर्जर झालाय, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर काँग्रेसनं आता पलटवार केला आहे. धड न पत्रकार, धड न राजकारणी अशा अर्धवटरावांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास, त्याची धोरणे, कार्यक्रम, जनाधार याविषयी अडाणीपणाची लेखनकामाठी करून आपली हौस भागवून घेऊ नये, त्याऐवजी आपल्या स्वतःच्या पक्षाचा इतिहास, विचारशून्य राजकारण व वाटचाल आणि केवळ सत्तापदावरून ऐन वेळी मारलेली कोलांटी यावर आत्मपरीक्षण करावे, असा पलटवार काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांनी केला आहे. आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षावर भाष्य करताना संयम बाळगावा लागतो याचेही भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसतोय. त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असंसुद्धा संजय राऊत म्हणाले होते.  मधल्या काळात २३ नेत्यांनी जे काही सोनिया गांधींना पत्र पाठवलं, त्यावरचा वाद अजून क्षमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की  काय, अशी मला भीती वाटतेय. त्या २३ नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावं, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाला गांधी  कुटुंबीयांशिवाय पर्याय नाही ही लोकभावना आहे.काँग्रेसचा अंतर्गत विषय देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे. काँग्रेस पक्षातून फुटूनच ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःचे पक्ष तयार केले. त्यामुळे काँग्रेसचा सारखा पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात टिकला पाहिजे. समोर प्रबळ विरोधी पक्ष असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काम करण्याचा उत्साह येतो. राज्यात आमच्या समोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे,  ज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले होते. 

टॅग्स :संजय राऊतकाँग्रेस