Prithviraj Chavan Exclusive: काँग्रेसमध्ये २४ वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांचं वर्मावर बोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:48 IST2022-04-21T20:18:35+5:302022-04-21T20:48:23+5:30
Prithviraj Chavan Exclusive: पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये वैफल्याची भावना आली असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Prithviraj Chavan Exclusive: काँग्रेसमध्ये २४ वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांचं वर्मावर बोट
मुंबई: अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते अजूनही वैफल्यग्रस्त भावनेत आहेत. त्यांना सावरण्याचे काम दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी ‘टू द पॉइंट’अंतर्गत पृथ्वीराज चव्हाण विशेष मुलाखत घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी आणि भाजप तसेच काँग्रेस पक्षाची वाटचाल यासह अनेक विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणाने मते मांडली.
जी-२३ गटाबाबत विचारले असता, जी-२३ गट असे काही नाही. पण केंद्रीय मंत्रीपद, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, मुख्यमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधावा, असे ठरले. कारण, कोरोना काळात त्यांची भेट होणे शक्य नव्हते. सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिनाभर वाट पाहूनही ते घडत नव्हते. सोनिया गांधी यांनी अंतरिम पद स्वीकारून एक वर्ष झाले होते. मात्र, अंतरिम पद कायमस्वरुपी ठेवण्यासारखे नव्हते. मात्र, सोनिया गांधींची तब्येत बरी नव्हती, कोरोना होता. शेवटी २३ जणांनी एकत्रितपणे येऊन सोनिया गांधींना पत्र लिहिले, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पुढील निवडणुकांवेळी याचा फायदा होईल
आम्ही २३ नेत्यांनी मिळून सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र कॉन्फिडेंशियल होते. मात्र, दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राला सिलेक्टिव्ह लीक स्वरुपात ते पत्र मिळाले. त्यामुळे पक्षाविरोधात बंड केल्याचे चित्र निर्माण झाले. पत्र लिहिल्यानंतर ४ महिन्यांनी सात-आठ जणांना बोलावण्यात आले आणि पाच तास बैठक झाली. त्यात झालेल्या गोष्टींबाबत आम्ही मीडियाला सांगितले. निवडणुका झालेल्या नाहीत. यासह अनेक गोष्टी सोनिया गांधी यांना सांगितल्या. जी-२३ चा उद्देश आणि प्रत्यक्ष गोष्टी या काही साध्य झाल्या नाही. काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका होऊन लोकशाही मार्गाने पक्ष पुन्हा चालायला लागेल. पुढील निवडणुकांवेळी याचा फायदा होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
काँग्रेसमध्ये २४ वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत
काँग्रेस अत्यंत अडचणीच्या काळात असताना १९९८ मध्ये पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली. त्यापूर्वी काँग्रेसचा सलग पराभव होत होता. १९९८ पासून आता २०२२ पर्यंत जवळपास २४ वर्ष काँग्रेस कार्यकारिणी, काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेस संसदीय मंडळाच्या, निवडणूक समितीच्या किंवा अन्य खालच्या स्तरावरील कोणत्याही पदाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुकांचे उद्दिष्ट दुय्यम दर्जाचे नेतृत्व देशभरातून यावे आणि ते निवडून आलेले असावे. पक्षाच्या निवडणुका न झाल्यामुळे ते झालेले नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीत २४ सदस्य असतात. १२ निवडून आलेले आणि १२ नियुक्त केलेले सदस्य असतात. ते नेमलेल्या माणसांमुळे ६० वर गेले आहे. ती नेमलेली माणसे देशाचे नेतृत्व वा प्रतिनिधीत्व करणारी नाहीत. त्यामुळे वर्किंग कमिटीच्या सदस्यांचा चांगला सल्ला मिळेल, अशी वस्तुस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही शक्य तितक्या निवडणुका घेण्याची विनंती केली होती. किमान वर्किंग कमिटीच्या निवडणुका घ्याव्यात. पण ते अजून होऊ शकलेले नाही. सोनिया गांधी यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत काँग्रेसच्या घटनेप्रमाणे निवडणुका होतील, असे आश्वासन दिले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.