Join us  

"इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 1:40 PM

Sachin Sawant And Sushant Singh Case : "सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही"

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला एक महिना लोटला तरी सीबीआयकडून काहीच हालचाल झालेली नाही, कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. यावर, ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई?’, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्न विचारत सचिन सावंत यांनी सीबीआय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे? का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुका होईपर्यंत काही हालचाल करु नका, असे आदेश सीबीआयला दिले आहेत असं म्हटलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात राजकारण केले जात असून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने केला यावर सुप्रीम कोर्टने शिक्कामोर्तब केले होते असं देखील म्हटलं आहे.

कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाचीच पुष्टी एम्सच्या पॅनलनेही केली आणि सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे सिद्ध झाल्याने ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजपा’ तोंडावर आपटला. सुशांतसिंहच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे हे षडयंत्र होते. त्यासाठीच सीबीआयसह तीन तीन केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला हे आता सिद्ध झाले आहे. त्यांचा कुटील डाव त्यांच्यावर उलटल्याने सीबीआयला गप्प राहण्यास सांगितले असावे, असंही सावंत यांनी म्हटलं आहे. 

"एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालंय, कटकारस्थानांचा झाला पर्दाफाश"

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी 'एम्स'ने दिलेल्या अहवालानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. 'एम्स'च्या अहवालामुळे भाजपचं तोंड काळं झालं आहे अशी जोरदार टीका सचिन सावंत यांनी केली होती. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले होतं. "एम्सच्या अहवालामुळे भाजपाचं तोंड काळं झालं आहे. भाजपाच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तेश्वर पांडे यांना उगाच स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली नाही. मुंबई पोलिसांना ज्या वाईट पद्धतीने बदनाम करण्यात आलं, महाराष्ट्राचा अपमान केला गेला. ते पाहता महाराष्ट्राची जनता भाजपाला माफ करणार नाही"असं सावंत यांनी म्हटलं होतं. 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसुशांत सिंगसचिन सावंतगुन्हा अन्वेषण विभागकाँग्रेसभाजपा