संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 15:58 IST2023-07-28T15:57:22+5:302023-07-28T15:58:37+5:30
Maharashtra Monsoon Session 2023: राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाणांनी केली.

संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...”
Maharashtra Monsoon Session 2023: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनातही या विधानाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण चांगलेच आक्रमक झाले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावा संभाजी भिडे यांनी केला. यावरून आता संभाजी भिडे गुरुजींवर टीका केली जात आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतायत
सभागृहात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची दखल घेतली. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. यावर, याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.