Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता भाजपच्या मित्रपक्षांना ‘ऑपरेशन कमळ’ची भीती! शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:13 IST

काँग्रेसची टीका

मुंबई : ऑपरेशन कमळच्या माध्यमातून भाजपाने विरोधी पक्ष फोडले. आता  या ऑपरेशन कमळची भीती भाजपाच्या मित्रपक्षांनाही वाटू लागली आहे. त्या भीतीनेच उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे विजयी नगरसेवक लपवावे लागत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. शिंदेसेनेने आपल्या विजयी उमेदवारांना ताज लँड्स एन्ड मध्ये ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे.  शनिवारी मुंबई काँग्रेसने राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी   मुख्य प्रवक्ते सचिन सावंत बोलत होते. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. विरोधी पक्षातील उमेदवार पळवणे, पक्ष फोडणे, विरोधी पक्षाला कोणतीच मदत मिळू नये, निधी मिळू नये असे सर्व प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले. अनैतिक वातावरणातही काँग्रेस पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते तग धरून उभे राहिले, निकराने लढले, असे सावंत म्हणाले. काँग्रेसने १५२ उमेदवार उभे केले होते त्यातील २४ निवडून आले आहेत. निवडणुकीतील या निकालाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हुरूप कमी झालेला  नाही, हा विजय ऊर्जा देणारा आहे, पुन्हा नव्या ताकदीने व जिद्दीने लढू, निकालाचे विश्लेषण करू. लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई यापुढेही लढत राहू. आम्हाला मिळालेले यश मोठे नसले तरी समाधानकारक आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देऊ, असेही  ते म्हणाले.

...तर अधिक मोठे यश

वंचित बहुजन आघाडी संदर्भात जो आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे, त्यांना हव्या असलेल्या जागा दिल्या, त्यांना उमेदवार मिळाले नाहीत, काही जागांवर मैत्रीपूर्ण लढावे लागले. दोन्ही बाजूकडून अधिक चांगल्या प्रकारे नियोजन झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६एकनाथ शिंदेकाँग्रेस