Join us  

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 4:26 PM

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाला उभारी दिली. काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं लोकशाही असून गांधी कुटुंबानंच पक्षाचं नेतृत्व करावं. तसेच गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचं मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या इच्छेनुसारच काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडावं तर आम्ही बाहेर पडू, असं मोठं विधानही विजय वडेट्टीवर यांनी केलं होतं. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. 

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकारमधून बाहेर पडावा अशी इच्छा राहुल गांधी यांची नाही. आमचा त्यांच्याशी योग्य संवाद सुरू आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशाची प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका सांभाळण्यासाठी काँग्रेसला स्वत:ला सावरणं गरजेचं असल्याचं संजय राऊत यांनी सांगतिले. गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड आहे. गांधी घराण्यापलीकडे कोणी नेतृत्व करावं हे संयुक्तिक नाही. काँग्रेसचे नेतृत्व करण्याइतकी क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये आहे' असेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारणीची बैठक सोमवारी बोलवण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षावरून बराच खल होऊन अखेरीस नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधींकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, आता २३ नेत्यांनी पत्र लिहून केलेल्या नेतृत्वबदलाच्या मागणीनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. मात्र पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडेच कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला. 

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं होतं काय?

देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं होतं.

टॅग्स :संजय राऊतकाँग्रेसराहुल गांधीशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार