Join us

“महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:53 IST

Maharashtra Politics: हे सरकार जनतेच्या मनातील आणि मतातील नाही. महायुती सरकार कसे आले, असा लोकांचा प्रश्न आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. ईव्हीएमवर आरोप करत त्याविरोधातील भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावून धरली आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली.

नाना पटोले म्हणाले की, मॉक पोलिंगचा दृष्टीकोन घेऊन काम करत आहोत. जनतेच्या भावना अशा आहेत की, हे सरकार जनतेच्या मनातील नाही. आमची मते चोरली गेली आहेत. रात्रीतून ७६ लाख मते वाढली आहेत तिथेच हा सगळा खेळ दिसून आला. जनभावना मांडण्यासाठी हे सभागृह आहे. जनभावना मांडण्याचे काम आम्ही केले. आमची लढाई विधानसभेतही लढू आणि रस्त्यावरही लढू. प्रतिकात्मक निषेध नोंदवत आम्ही आमदारकीची शपथ घेतली नव्हती. आता आम्ही सगळ्या आमदारांनी शपथ घेतली आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. 

एकदा मतदान केले की तुमचा अधिकार नाही असेच सरकार वागते आहे

माझे मत माझा अधिकार आहे. मतदान केल्यानंतर आपला काही अधिकार उरतो की नाही? शेतकरी पुन्हा सीमेवर जमले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार मान्य करणार की नाही? सरकार जनभावनेचा आदर करणार की नाही? देशात बेरोजगारी वाढली आहे. नोकरी नसणाऱ्या तरुणांनीही मोर्चे काढले त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. एकदा मतदान केले की तुमचा अधिकार नाही असेच सरकार वागत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

दरम्यान, खरे तर एकट्या मारकडवाडीचाच विषय नाही. प्रत्येक गावात हा विषय निर्माण आहे. आलेले सरकार हे जनतेच्या मनातले आणि मतातले नाही. हे सरकार कसे आले याचाच लोकांना प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभांची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होणे आणि अशा पद्धतीने असंतोष समोर येणे याची दखल घेतली पाहिजे. महायुतीने ७६ लाख मते मिळवली कशी काय, असे पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :ईव्हीएम मशीनविधानसभाविधान भवनकाँग्रेसनाना पटोलेनाना पटोले