Congress Nana Patole News: राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.
जनजागृती करणे गरजेचे आहे
जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाय योजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते पण जीबीएससारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या शनिवारी या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. अंधेरी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. राज्यात पुणे जिल्ह्यातच सध्या या व्हायरसचे सर्वाधिक १९७ रुग्ण आढळून आले आहेत. पण आजाराला घाबरण्याची काहीच गरज नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.