Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदाराला बिष्णोई गँगची धमकी, फोनवर मागितले १० कोटी रुपये; विधिमंडळाने घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 06:33 IST

Congress MLA gets death threat from Bishnoi gang: काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला.

मुंबई : काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिष्णोई गँगकडून मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

वडेट्टीवार म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता साजिद पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉल आला. स्वतःला शुबम लोणकर असे सांगणाऱ्या व्यक्तीने आपण बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले आणि १० कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

त्यांनी पुढे सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली तरी महिनाभर-दोन महिने संरक्षण मिळेल; मात्र, सहा महिने किंवा वर्षभरानंतर ठार मारू, अशी उघड धमकी दिली. लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला तत्काळ पावले उचलण्याचे व आमदारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मात्र, सभागृहात साजिद पठाण यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress MLA receives Bishnoi gang threat, extortion demand of ₹10 crore

Web Summary : Maharashtra Assembly directs government action after Congress MLA Sajid Khan Pathan received a ₹10 crore extortion threat from the Bishnoi gang. Vijay Wadettiwar raised the issue, highlighting the threat's severity and demanding increased security for legislators. Speaker Narvekar ordered immediate measures for MLA safety.
टॅग्स :गुन्हेगारीविधान भवनविधानसभाकाँग्रेस