Join us

'मिलिंद देवरा शिंदे गटात जातील ही अफवा'; काँग्रेसच्या आमदाराने चर्चा खोडून काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 16:17 IST

मिलिंद देवरा नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार चाचपणीला सुरुवात केली असून, जागावाटपावर भर दिला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद असून, हा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीने तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेसचा मुंबईतील मोठा चेहरा म्हणून ओळख असणारे माजी खासदार मिलिंद देवरा नाराज असून, लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतो, असा कयास बांधला जात आहे. 

काँग्रेस नेते मिलिंद देवरा पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. मिलिंद देवरा यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, असे म्हटले जात असून, शिंदे गटातील प्रवेशामुळे पर्यायाने महायुतीची ताकद वाढेल, अशी चर्चा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जाते. 

शिवसेनेच्या शिंदे गटाचा नवी दिल्लीत कोणीही चेहरा नाही. मिलिंद देवरा यांचे दिल्ली वर्तुळातील संबंध लक्षात घेता शिंदे गटाने त्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे सांगितले आहे. मात्र काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या चर्चा फोटाळल्या आहेत. मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ही एक मोठी अफवा आहे. अशा अफवा विरोधक नेहमी उठवत असतात. त्यामुळे मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, दरम्यान, माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. अरविंद सावंत हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर सावंत हे ठाकरे गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा सोडण्याची शक्यता नाही. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याचे समजते. 

टॅग्स :काँग्रेसलोकसभानिवडणूकएकनाथ शिंदेप्रणिती शिंदे