Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 06:08 IST

आम्ही सर्व बाजूंचा विचार करूनच आश्वासन देतो, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात प्रत्येक गोष्ट महाग झाली. मोदींची गॅरंटी ही वस्तूंच्या किमती वाढविण्याची आणि खोटे बोलण्याची आहे. मात्र, काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणात सत्ता मिळताच सर्व गॅरंटी पूर्ण केल्या. आम्ही सर्व बाजूंचा विचार करूनच आश्वासन देतो, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नमूद केले.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित सभेत बोलताना खरगे यांनी मोदी यांच्या गॅरंटीचा समाचार घेतला. मोदींनी १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पैसे दिले नाहीत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, ते केले नाहीत. मोदी हे जगातले सर्वाधिक खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत. ते खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीकाही खरगे यांनी केली.

मोदी एससी, एसटी आणि मागासवर्गांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ देत नाहीत. देशात ३० लाख सरकारी जागा रिकाम्या आहेत. या जागा भरल्यास मागास वर्गातील घटकांतील १५ लाख जणांना रोजगार मिळेल. या देशातील संविधानाला मोदी आणि आरएसएस लाख प्रयत्न करूनही हात लावू शकत नाहीत. देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचे नामोनिशाण राहणार नाही, असेही खरगे म्हणाले.

मुंबईत होर्डिंग पडून अनेकांचा मृत्यू झाला. मोदी मुंबईत आले होते. परंतु ते या लोकांना पाहायला गेले नाहीत. त्यांनी या लोकांकडे दुर्लक्ष केले. हीच मोदींची गरिबांप्रती संवेदना आहे का? असा प्रश्न खरगे यांनी उपस्थित केला.

मोदी मला भटकती आत्मा म्हणाले. आत्मा कधी असतो माणूस गेल्यानंतर, पण हा आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे काही करायचे आहे, त्यासाठीची ताकद आम्हाला मिळणार आहे.    - शरद पवार, ज्येष्ठ नेते

नरेंद्र मोदी 'वन नेशन, वन लिडर' हे धोरण आणू पाहत आहेत. या निवडणुकीनंतर ते मला, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना तुरुंगात टाकू इच्छित आहेत. - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

महाराष्ट्राने तुमच्यावर दोनवेळा प्रेम केले आणि ४० पेक्षा जास्त खासदार दिले. मी पण त्यात सामील होतो, मला पश्चाताप होत आहे. पंतप्रधान झाल्यावर यांनी महाराष्ट्र, मुंबई लुटली, बाळासाहेबांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना

 

टॅग्स :मल्लिकार्जुन खर्गेमहाविकास आघाडीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४