विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:20 IST2019-06-24T14:19:57+5:302019-06-24T15:20:50+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवड
मुंबई - काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्या निवडीनंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात त्यांचे अभिनंदन केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. त्यासाठी, विधानसभा अध्यक्षांनी प्रस्ताव ठेवला होता.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. या जागेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत होती. विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वडेट्टीवार यांचे जागेवर जाऊन अभिनंदन केले.
Senior Congress leader Vijay Wadettiwar appointed as the new leader of Opposition (LoP) in the Maharashtra Legislative Assembly. pic.twitter.com/MHgH6DZvLj
— ANI (@ANI) June 24, 2019
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. युतीत उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. त्यानंतर, शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांचे नाव नक्की केले होते. दरम्यान, काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड केली होती. त्यांना विरोधी पक्षनेते करण्याबाबत आघाडीने विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रही पाठविले होते.