Join us  

"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं"

By मुकेश चव्हाण | Published: January 17, 2021 3:09 PM

राज्यात लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई: कोविन ॲपमध्ये शनिवारी संध्याकाळी उशिरा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेला लसीकरण मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली आहे. त्यामुळे ही समस्या दूर होईपर्यंत १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले असल्याचे पालिका प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केले. लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

संजय निरुपम ट्विट करत म्हणाले की, कोरोनाच्या लसीकरणाचे उद्धाटन करताना फोटो काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वत:चे फोटो काढून घेतले. त्यामुळे फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर चांगलं झालं असतं. दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता, असा खोचक टोला संजय निरुपम यांनी लगावला आहे.

तत्पूर्वी, कोरोना लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. शनिवारी तांत्रिक अडचण आल्याने ऑफलाइन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. यापुढील सर्व नोंदी ॲपद्वारेच करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मुंबईत रविवार १७ जानेवारी आणि सोमवार १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात येणार आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा आरंभ-

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी लसीकरण मोहिमेचा आरंभ करण्यात आला. दिवसभरात लसीकरण मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरू होते. राज्यात कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात पहिल्या दिवशी ६४ टक्के लसीकरण

राज्यातील २८५ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यातील सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर अन्य केंद्रांवर सिरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली. राज्यात पहिल्याच दिवशी सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे.

राज्यात दिवसभरात मुंबईत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले. मुंबईत ६६०, मुंबई उपनगरात १२६६ कर्मचाऱ्यांचे म्हणजेच एकूण १ हजार ९२६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल पुण्यात १ हजार ७९५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. राज्यात वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय निरुपमकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार