राहुल गांधी धारावीत; स्वतः शिलाई मारून तयार केली पर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:48 IST2025-03-06T21:47:13+5:302025-03-06T21:48:11+5:30
राहुल गांधी बुधवारी दुपारी धारावी येथे दाखल होऊन धारावीतल्या छोट्या गल्लीबोळात असलेल्या या उद्योगाच्या ठिकाणी दोन तास रमले.

राहुल गांधी धारावीत; स्वतः शिलाई मारून तयार केली पर्स
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी मुंबईत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत भेट दिली. यावेळी त्यांनी कोणतीही राजकीय चर्चा अथवा टीका टिप्पणी न करता केवळ धारावीतील चर्मोद्योगाला भेट देऊन हा उद्योग जागतिक स्तरावर अधिक मोठ्या प्रमाणात कसा नेता येईल यासाठी चर्चा केल्याची माहिती स्थानिक उद्योजकांनी दिली.
परदेशातील एका ठिकाणी चमार या ब्रँडची वस्तू पाहायला मिळाल्यानंतर कुतूहल जागे झालेल्या राहुल यांनी या वस्तूच्या उत्पादनाबाबत चौकशी केली असता की भारतातील मुंबईतील धारावी येथे तयार झाल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यात ती माहिती मिळताच राहुल गांधी यांनी संबंधित ब्रँडच्या उद्योजकांना संपर्क साधून माहिती घेतली आणि धारावीतील हा छोटा उद्योग पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार राहुल गांधी बुधवारी दुपारी धारावी येथे दाखल होऊन धारावीतल्या छोट्या गल्लीबोळात असलेल्या या उद्योगाच्या ठिकाणी दोन तास रमले.
राहुल गांधींनी तयार केली पर्स
धारावीतल्या छोट्याशा गल्लीतील या कारखान्यात राहुल गांधी यांनी सस्टेनेबल मटेरियल पासून बनवण्यात आलेल्या एका पर्सला स्वतः शिलाई मारून ती त्यांनी तयार केली. धारावीतल्या झोपडपट्टीत मोठ्या ब्रांच च्या वस्तू तयार होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करीत या उद्योगासाठी कशा पद्धतीने जास्तीत जास्त मदत करता येईल आणि भारताबाहेर या वस्तूंना कशी अधिक मागणी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याचे स्थानिक उद्योजक सुधीर राजभर यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी यावेळी अत्यंत साधेपणाने कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची भेट घेतली आणि ते धारावीत कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी न करता रवाना झाले.
राहुल गांधींना मिळाल्या भेटवस्तू
या दौऱ्या दरम्यान धारावीतील उद्योजक सुधीर राजभर यांनी राहूल गांधी यांना चामड्याचे पाकिट, प्रियंका गांधी यांच्यासाठी पर्स तर सचिन शिंदे या उद्योजकाने राहूल यांचे नाव कोरलेले पेन आणि चामड्याची डायरी भेट म्हणून दिली.
धारावीच्या चर्मोद्योगाची वैशिष्ट्ये
धारावीतील चर्मोद्योगाची वार्षिक उलाढाल १३० दशलक्ष रुपये आहे.
या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक घरात चर्मोद्योगाचे काम केले जाते.
हा धारावीतल्या सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. कच्चे चामडे कसाईच्या दुकानात तयार केले जाते, ते प्राण्यांची कातडी वाळवतात आणि त्यात रसायने मिसळतात.
झोपडपट्ट्यांमध्ये वॉशर आणि ड्रायर वापरून तयार केलेले हे चामडे नंतर अनेक देशांमध्ये निर्यात केले जाते
हे चामडे गुच्ची, अरमानी, वर्साचे इत्यादी ब्रँडमध्ये वापरले जाते.