Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अशा परिस्थितीत घाई कशासाठी?" सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 08:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाली आहे.

Harshwardhan Sapkal on Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विधिमंडळ पक्षनेतेपदी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाली आहे. आज दुपारी विधानभवनात होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार असून, आज संध्याकाळीच लोकभवन येथे त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे.

तातडीच्या निर्णयामागचे राजकीय गणित

अजित पवारांच्या जाण्याने पक्षात आणि सरकारमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पदे जास्त काळ रिक्त राहिल्यास राजकीय वावड्या उठण्याची आणि अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने तातडीने पावले उचलली आहेत. शुक्रवारी दिवसभर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर आता पार्थ पवार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घाईगडबडीत होणाऱ्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"या सरकार जवळ स्पष्ट बहुमत आहे. बहुमताच्या पार पलिकडे हे सरकार आहे. या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना पुढे जाण्याची घाई का आहे याबद्दल मी काही बोलू शकत नाही," असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अजित पवारांच्या कुटुंबाच्या पाठीशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"अजित पवारांनी अर्थसंकल्पासाठी खूप मोठी तयारी केली होती. त्यांचे नियोजन पूर्ण करण्यासाठी उद्यापासून मी स्वतः या कामात लक्ष घालणार आहे. पक्षात किंवा कुटुंबात जो काही निर्णय होईल, त्याला आमचे समर्थन असेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोनदा माझी भेट घेतली असून, पुढील दिशा आम्ही एकत्रितपणे बसून ठरवू," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress questions the urgency of Sunetra Pawar's oath as Deputy CM.

Web Summary : Sunetra Pawar's rapid appointment as Deputy CM raises eyebrows. Congress questions the haste, despite government stability. Parth Pawar may get Rajya Sabha seat.
टॅग्स :सुनेत्रा पवारअजित पवारहर्षवर्धन सपकाळराष्ट्रवादी काँग्रेस