Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेल्यावेळी गमावलेल्या सगळ्या जागा काॅंग्रेसने दिल्या ‘वंचित’ला; ज्या २० जागा हव्या हाेत्या, त्याही दिल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:04 IST

काँग्रेसने वंचितला सोडलेल्या ६२ जागांमधील एक वगळता बाकी सर्व जागांवर काँग्रेस तिसऱ्यापासून आठव्या क्रमांकावर फेकला गेला होता.

जयंत होवाळ -

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असली तरी २०१७ मध्ये ज्या जागांवर काँग्रेसचा मोठा पराभव झाला, त्याच ६२ जागा ‘वंचित’ला देण्यात आल्याचे उघड झाले आहे. शिवाय ज्या २० जागा वंचितला हव्याच होत्या, त्यांपैकी काही जागा त्यांना सोडलेल्या नाहीत, असे जागावाटपावरून स्पष्ट झाले आहे.  

काँग्रेसने वंचितला सोडलेल्या ६२ जागांमधील एक वगळता बाकी सर्व जागांवर काँग्रेस तिसऱ्यापासून आठव्या क्रमांकावर फेकला गेला होता. २०१७ साली वंचितने (पूर्वाश्रमीचा भारिप) सुमारे सात जागा स्वबळावर लढल्या होत्या. मात्र, या सर्व ठिकाणी भारिपच्या उमेदवारांना एक हजार मतेही मिळाली नव्हती. याच निवडणुकीत काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या. ज्या ६२ जागा काँग्रेसने वंचितला सोडल्या आहेत, तिथेही पहिल्या क्रमांकावरील विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस उमेदवार यांच्या मतांमध्ये कमालीची तफावत होती. प्रभाग क्र. ११४ (भांडुप) मध्ये तर काँग्रेस पार आठव्या स्थानावर, तर अन्य एका प्रभागात सातव्या क्रमांकावर फेकला गेला होता. ही जागाही काँग्रेसने वंचितच्या गळ्यात मारली आहे. 

दुसऱ्या क्रमांकावरील काही मोजक्या जागा वगळल्यास वंचितला सोडलेल्या जागांपैकी जवळपास बहुसंख्य जागांवर काँग्रेस खूपच पिछाडीवर होता. 

२०१७ च्या निवडणुकीत सुमारे २३ प्रभागांत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता, तेथेही मतांची संख्या जेमतेम होती. २०१७ साली काँग्रेस ज्या जागांवर कमकुवत होता, त्या जागा वाट्याला आल्यामुळे वंचितला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे.

गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर, विक्रोळी, भांडुप या दलितबहुल  मतदारसंघात काही जागा मिळतील, अशी वंचितच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली असून एकूणच पदरी पडलेल्या जागांमुळे वंचितचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असल्याचे कळते. या संदर्भात वंचितच प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

युती, आघाडीच्या खेळात मागे पडलेल्या काँग्रेसने वंचितशी आघाडी करून आपण एकटे नाहीत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला खरा; पण मित्र पक्षाला हातभार लागेल अशा जागा सोडण्यात मात्र हात आखडता घेतल्याचे दिसते. तडजोड करणार नाही, अशी भूमिका घेत वंचितने प्रभाग क्रमांक ३, २६, ११६, १३२, १४०, १५०, १५२ सह काही जागा मागितल्या,  पण, त्या जागा काँग्रेसने दिल्या नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress gives 'Vanchit' lost seats; desired 20 seats denied.

Web Summary : Congress ceded 62 previously lost seats to Vanchit Bahujan Aghadi for Mumbai's BMC election. Vanchit's request for 20 specific seats was unmet, causing disappointment among Vanchit workers. Congress seemingly prioritized optics over strategic alliance support.
टॅग्स :काँग्रेसमुंबई महापालिका निवडणूक २०२६वंचित बहुजन आघाडी