“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:47 IST2025-10-15T14:44:41+5:302025-10-15T14:47:35+5:30
Congress Balasaheb Thorat PC News: बाळासाहेब थोरात यांनी मतदारयादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
Congress Balasaheb Thorat PC News: राज्यातील मतदार यादीत लाखो चुका आहेत, ही यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरली. आता तीच यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीतील दोष दूर करून त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडी-सहयोगी पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन केली. मुंबई महापालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी राज ठाकरे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. आता पुन्हा दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते आणि राज ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो. पण आमचे समाधान झाले नाही. निवडणूक आयोगाने उत्तर दिले नाही. या चुकीच्या यादीसोबतच निवडणूक होणार आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा देश पातळीवर मांडला आहे. कॉलेजच्या मालकांकडून बाहेरून आलेल्या लोकांची नावेही मतदार म्हणून यादीत असल्याचा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
आगामी निवडणुकांसाठी हे चित्र योग्य नाही
गेल्या सहा-सात महिन्यात यादीचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही, दुरुस्ती झाली नाही. केंद्राची जबाबदारी होती, त्यांनी ते केले नाही. तर राज्य निवडणूक आयोग म्हणतो, आमचा संबंध नाही. त्यामुळे याच दोषी यादीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे, जे योग्य नाही, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी मतदारयादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील दोषांकडे लक्ष वेधले होते, परंतु आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी, ती निवडणूक दोषासहित झाली. आमदार सांगतात की, २० हजार मतदान बाहेरून आणले गेले. काहींची नावे वगळली गेली, तर तीच नावे वारंवार दिसत आहेत. हॉस्टेलमध्ये राहणारे बाहेरच्या राज्यातील लोकही मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेली मतदार यादी विधानसभा निवडणुकीत होती, असा दावाही थोरात यांनी केला.